नाशिक – श्रेष्ठदान महाअभियानच्या वतीने येथे देहदान, अवयवदानविषयी शनिवारी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात हे अधिवेशन होणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आ. हिरामण खोसकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अभियानाचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी दिली.

हेही वाचा – धुळे मनपात समाविष्ट गावांचा करवाढीला विरोध; उपोषणाचा इशारा

अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राआधी सकाळी नऊ वाजता शहर परिसरातील वेगवेगळ्या मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. फेरीत वैद्यकीय महाविद्यालये आणि परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उद्घाटन सत्रात महादान २०२३ विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि श्रेष्ठदान याबाबत वैद्यकीय क्षेत्राची अपेक्षित भूमिका या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये डॉ. राजेंद्र कुटे, डॉ. भाऊसाहेब मोरे सहभागी होतील. दुपारी तीन वाजता श्रेष्ठदानाच्या संबंधित कायद्यांमध्ये बदलांची गरज, तसेच कायद्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत अपेक्षित बदल अंतर्गत पोलीस यंत्रणांचा सहभाग व जबाबदारी या विषयावर डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. कैलास जवादे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चासत्र होईल.

हेही वाचा – धुळे मनपा दवाखान्यांना कुलूप पाहून महापौर संतप्त; कारवाईचा इशारा

सर्वश्रेष्ठ दानाबाबत स्वयंसेवी संस्थांची अपेक्षित भूमिका या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सुशील मेश्राम, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. अर्चना पाटे, डॉ. मीनाक्षी देशपांडे सहभागी होतील. सायंकाळी सहा वाजता महादानाची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यामध्ये शाहीर जालिंदर केरे, शाहीर अर्जुन लगस, मीना परुळेकर गीते सादर करणार असून, अमोल पाळेकर संगीतसाथ करतील.

अधिवेशनात दुसऱ्या दिवशी रविवारी विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्र आणि त्यांच्या समन्वयकांची भूमिका, कायदा आणि अंमलबजावणीत सुसूत्रता येण्यासाठी सुधारणांची आवश्यकता या विषयावर डॉ. संजय रकिबे, डॉ. प्रवीण शइनगारे, डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. वैशाली भारंबे यांच्या उपस्थितीत चर्चासत्र होईल. दुपारी प्रत्यक्ष देहदान आणि उतीदान प्रक्रिया घडवतांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करावी, याविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशांत पागनीस, डॉ. युवराज भोसले, पुरुषोत्तम पवार, शुभदा कुडतलकर आदी सहभागी होतील. समारोप दुपारी होणार असून, यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहेत.