नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय व्हॉईस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा राजकीय पक्षविरहित असून स्पर्धेला केवळ विरोधासाठी विरोधक विरोध करत आहेत. ही स्पर्धा होणारच असून १५ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत सहभागासाठी मुदत वाढवून देण्यात आल्याचे नाशिक प्रतिष्ठानचे सागर शेलार, प्रथमेश नाईक यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.

मुंबई येथील स्वरारंभ प्रतिष्ठान, पुणे येथील आयफेलो फाउंडेशन आणि नाशिक प्रतिष्ठानसह नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब, संदीप युनिव्हर्सिटी आणि भोसला शैक्षणिक संस्था यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेला, विचारमंथनाला आणि अभिव्यक्ती कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लोकशाही मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सकारात्मक संवाद संस्कृती यांना या माध्यमातून बळकटी देण्यासाठी प्रयत्न होत असतांना विरोधक या स्पर्धेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आयोजकांनी केला.

स्पर्धेचे केवळ नाव व्हॉईस ऑफ देवेंद्र असे असून देवेंद्र फडणवीस किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा या स्पर्धेशी संबंध नाही. यंदा स्पर्धेसाठी विकसित महाराष्ट्र असा विषय देण्यात आला असून राज्याची सर्वांगीण प्रगती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासाशी संबंधित संकल्पनांवर विद्यार्थ्यांना आपले मत दृकश्राव्य पध्दतीतून मांडायचे आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान मंच मिळावा, यासाठी प्रयत्न होत आहे. शेलार यांनी, ही स्पर्धा कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी किंवा विरोधासाठी नसल्याचे नमूद केले. देवेंद्र या नावाने राज्यातील जनतेच्या मनात ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रेरणेतून स्पर्धेला नाव घेण्यात आले आहे. स्पर्धेचे विषय, परीक्षक, नियमावली आणि पुरस्कार वितरण सर्व प्रक्रिया अराजकीय निकषांवर असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कानाकोपऱ्यातून एक हजारांहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. स्पर्धकांचा प्रतिसाद पाहता १५ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा रद्द झालेली नाही. उपांत्य फेरी नाशिक आणि अंतिम फेरी मुंबईमध्ये होणार आहे.

व्हॉईस ऑफ देवेंद्र वाद काय ?

स्पर्धा ही राजकीय प्रचार आणि प्रसार करणारी वाटत आहे. याबाबत आयोजकांनी पुणे विद्यापीठाला लेखी पत्र देत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विनंती केली. विद्यापीठाने तसे परिपत्रकही काढले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) आ. रोहित पवार यांनी स्पर्धेस विरोध केल्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतले. स्पर्धेचे राजकीयकरण करण्यात येत असल्याचे सांगितले जात असतांना आता आयोजकांनी पवार कुटूंबियांनी बारामतीत शरद पवार यांच्याविषयी स्पर्धा घेतली. हे स्पर्धेचे राजकीयकरण नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. स्पर्धेसाठी स्पर्धक महाविद्यालयांमध्ये नाही तर डान्स बार, दारुच्या अड्ड्यांवर शोधायचे का, असा प्रश्नही यावेळी करण्यात आला.