मित्रासाठी साडेसहा लाखांचे दागिने, रोकड चोरली

नाशिक : मित्राची मोटारसायकल आणि भ्रमणध्वनी घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने अल्पवयीन मैत्रिणीकडे पैशांची मागणी केली. मग उभयतांनी शक्कल लढविली. वाढदिवसानिमित्त नातेवाईकाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मैत्रिणीने त्या घरातून साडेसहा लाखाचे दागिने चोरून मित्राला दिले. संशयित मित्र-मैत्रिणीला मुद्देमालासह अवघ्या दोन तासात मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

जनरल वैद्य नगरात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशाने घरात चोरी झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्य़ात सहा लाख, ५९ हजार ७२० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. तक्रारदाराच्या घरी १४ जून रोजी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यांनी जवळच्या नातेवाईकांना निमंत्रित केले होते. त्यावेळी नणंदेसोबत तिची १५ वर्षांची नातदेखील वाढदिवसासाठी आली होती. तिच्यावर तक्रारदाराने संशय व्यक्त केला. या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, साजिद मन्सुरी यांनी त्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली. मुलीचा मित्र संशयित दीप भालेराव (२०) यास  मोटारसायकल आणि भ्रमणध्वनी घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी या मुलीने थेट नातेवाईकाच्या घरात चोरी केली. वाढदिवस झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आजीने रात्री नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला होता. तेव्हा या मुलीने ही चोरी केली.