नाशिक – एखादा शासकीय कर्मचारी महापालिकेच्या कारभाराविरोधात वारंवार तक्रारी कशा करू शकतो, असा प्रश्न करीत घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्र्यंबक रस्त्यावरील एका शासकीय कार्यालयात वरिष्ठांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
शहरातील अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवर पडलेला कचरा, वाहतुकीस अडथळा ठरणारी खडी-माती, धूळ अशा सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांंकडे संबंधिताने तक्रारीद्वारे मनपाचे लक्ष वेधले आहे. त्या सोडविण्याऐवजी मनपाचे अधिकारी-कर्मचारी तक्रारदारावर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. तक्रारदाराला तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप स्वप्नील गायकवाड यांनी केला आहे.
हेही वाचा >>>नाशिक: दुकान निरीक्षकास लाच स्विकारताना अटक
शासकीय सेवेत कार्यरत गायकवाड हे त्र्यंबक रस्त्यावरील कार्यालयात काम करतात. सामान्यांशी निगडीत प्रश्नांवर ते शासकीय कार्यालयांमध्ये नियमितपणे पत्रव्यवहार करतात. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मनपाकडे तक्रारी करतात. मध्यंतरी त्यांनी रविशंकर मार्गावर अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास राडारोडा फेकला जात असल्याचे मनपाला कळविले होते. संबंधित वाहनाचा क्रमांकही छायाचित्रासह त्यांनी दिला होता. अशोका रस्त्यालगत एका खासगी रुग्णालयालगत अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या फळ व अन्य विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे त्यांनी लक्ष वेधले होते. उघड्यावर जाळला जाणारा कचरा असो वा एखाद्या बांधकाम प्रकल्पात रस्त्यावर आलेली खडी-माती असो अशा दृष्टीपथास पडणाऱ्या बाबींवर त्यांच्याकडून तक्रारीद्वारे लक्ष वेधण्यात आले. तथापि, ही बाब मनपातील स्वच्छता निरीक्षकांना रुचली नाही. घनकचरा विभागातील दोन स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी गुरुवारी त्यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली. शासकीय कर्मचारी असूनही गायकवाड हे मनपाच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी करतात. त्यांच्यावर शिस्तभंग वा तत्सम स्वरुपाची कारवाई करावी, अशी मागणी स्वच्छता निरीक्षकांनी केली.
हेही वाचा >>>नाशिक : शिधापत्रिकेवरील धान्याचा काळाबाजार, वाहनातून १२ लाखाचा साठा जप्त
यापूर्वी मनपाच्या कर्मचाऱ्यांचे असेच अनुभव आल्याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले. टिळकवाडीत एका इमारतीचे पाडकाम सुरु होते. राडारोड्यामुळे सर्वत्र धूळ पसरली होती. याबाबत तक्रार केल्यावर मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाने आपल्याला घटनास्थळी बोलावून घेतले. त्याचवेळी बांधकाम व्यावसायिकाला बोलावून तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय न ठेवता आपली सर्व माहिती पुरवून नियमभंग केला. या संदर्भात आपण संबंधित स्वच्छता निरीक्षकावर कारवाईचे निवेदन दिले होते. परंतु, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी नेमके काय घडले, संबंधिताने काय तक्रार केली, कोण स्वच्छता निरीक्षक होते, याची छाननी करून बोलणे योग्य ठरणार असल्याचे म्हटले आहे.
…तर तक्रार करण्यास कोण धजावेल ?
शहरातील सार्वजनिक हिताच्या विविध मुद्यांवर आपण करीत असलेल्या तक्रारी थांबविण्यासाठी मनपाचे स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी आपल्या कार्यालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गेले. सरकारी कर्मचारी असून ते तक्रारी कशा करतात. तक्रारी करू नयेत म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय अनुचित प्रकार असून आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याऐवजी मनपाचे अधिकारी आता तक्रारदारावर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. यामुळे कोणतीही व्यक्ती तक्रार करण्यास धजावणार नाही. तक्रारीवर कारवाई न करता तक्रारदारास लक्ष्य केले जाणे दुर्देवी आहे. मनपातील एक स्वच्छता निरीक्षक वारंवार असाच प्रकार करीत आहे. तक्रारदारावर दबाव टाकणारे मनपातील स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली जाणार आहे. – स्वप्नील गायकवाड (शासकीय कर्मचारी)