जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि छत्रपती संभाजीनगरातील महात्मा गांधी मिशन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला.
यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनवणे, प्र. कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिह बिसेन, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
दोन्ही विद्यापीठांशी करार केल्यामुळे जळगावमधील विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमासह ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (औषधीशास्त्र, शेती तंत्रज्ञान) या सारखे अनेक नवीन अभ्यासक्रम नियमित पदवी करतानाच शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अध्ययन, व्यक्तिमत्व विकास, नोकरीच्या विस्तृत संधी, करीअर पर्यायाची उपलब्धता आणि व्यापक शैक्षणिक संधी, असे अनेक लाभ होऊ शकणार आहेत.
आगामी काळ विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम तयार करून देण्याचा आहे. त्या अनुषंगाने या सामंजस्य कराराबाबत कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी चांगला पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होईल, असे प्रा. सपकाळ म्हणाले. २०४७ मधील विकसित भारताच्या अनुषंगाने नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. आजचा करार हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
विद्यापीठांनी एकमेकांसोबत काम करून विकसित राष्ट्र घडविणे आवश्यक आहे, असे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सोनवणे यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बहुआयामी, लवचिक आणि आंतर विद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.
दोन नियमित अभ्यासक्रम तासिकांचे वेळापत्रक सकाळ तसेच सायंकाळ सत्रात ठेवून किंवा एक नियमित अभ्यासक्रम आणि एक दूरस्थ अभ्यासक्रम, अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. ही व्यवस्था करून देण्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अग्रस्थानी आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड तसेच छंद असलेला अभ्यासक्रम नियमित अभ्यासक्रमासोबत पूर्ण करता येईल.
काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धतेसाठी किमान एक कौशल्य अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे मत कुलगुरू प्रा. माहेश्वरी व्यक्त केले. प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन कुलसचिव डॉ. पाटील केले. आभार प्रा. समीर नारखेडे यांनी मानले.