राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाने बुधवारपासून घाऊक तसेच किरकोळ बाजारातील दुकानांवर धाडसत्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशीच्या छाननीत या विभागाला कोणी साठेबाजी केल्याचे आढळून आले नाही.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने डाळी, खाद्य तेलबिया व खाद्यतेल यावर साठा मर्यादा लागू केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्व भागात दुकानांची तपासणी सुरू झाली. जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमधील तहसीलदार आणि पथक यांनी संयुक्तपणे साठेबाजांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शासन निकषानुसार महानगर पालिका क्षेत्रात घाऊक व्यापाऱ्यांना सर्व एकत्रित डाळींसाठी साडे तीन हजार क्विंटल, नगरपालिका क्षेत्रासाठी २५०० क्विंटल आणि इतर ठिकाणी १५००० क्विंटलची मर्यादा घालून दिली गेली आहे. किरकोळ बाजारात महापालिका हद्दीत २०० क्विंटल, नगरपालिका आणि इतर गावांसाठी १५० क्विंटल, खाद्य तेलबियांसाठी महापालिका क्षेत्रात घाऊकसाठी २००० क्विंटल, इतर ठिकाणी ८०० क्विंटल, तसेच किरकोळ बाजारात महापालिका व नगरपालिकेसाठी अनुक्रमे २०० क्विंटल आणि १०० क्विटंल राहणार आहे. शहर व तालुक्यांतील घाऊक तसेच किरकोळ व्यापार करणाऱ्या दुकानांची तसेच गोदामांची अचानक तपासणी करण्यात येत आहे.