नाशिक: देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीतील सुशील मार्ग हा सामांन्यांसाठी कागदोपत्री खुला असला तरी गेल्या चार वर्षापासून प्रत्यक्षात तो बंद आहे. लष्करी आस्थापनेने आता कायदेशीर प्रक्रियेद्वारे तो कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी केली आहे. सुशील मार्गाप्रमाणेच लष्करी हद्दीतील अन्य काही रस्ते याच प्रकारे केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे सांगितले जाते. भगूऱ येथील रेणका माता यात्रोत्सवात कॅफे मार्ग बंद ठेवल्याने स्थानिकांना सहा किलोमीटरचा वळसा घालावा लागला होता.
शहरालगत देवळाली कॅम्प भागात लष्कराचे केंद्र आहे. देवळाली छावणी मंडळाच्या सभोवताली देवळाली, भगूरसह अनेक गावे असून त्यांना ये-जा करताना लष्करी क्षेत्रातील काही मार्गाचा वापर क्रमप्राप्त ठरते. याकरिता छावणी परिषदेतील काही मार्ग नागरिकांच्या वापरास खुले ठेवण्यात आले आहे. यातील एक म्हणजे सुशील मार्ग, जो रेल्वे स्थानक तसेच लष्करी रुग्णालय, छावणी परिषद कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. तो सामान्य जनतेसाठी बंद झालेला आहे. कागदोपत्री खुले असणारे काही रस्ते करोना काळापासून बंद केल्याची स्थानिकांची तक्रार आहे. मार्च २०२५ मध्ये या रस्त्यात भिंती उभारून तो बंद करण्यात आला. या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी संरक्षण मंत्रालयाकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. तेव्हा दिल्लीकडून छावणी मंडळाकडे विचारणा झाली. आवश्यक प्रक्रिया न करता रस्ते बंद करणे उचित नसल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे लष्करी प्रशासन कायदेशीर प्रक्रिया राबवत आहे. लष्करी क्षेत्रातील सुशील मार्ग बंद करण्यासाठी छावणी परिषदेने नोटीस प्रसिद्ध केली असून हरकती व सूचना मागविल्या आहेत.
देवळाली छावणी हद्दीतील रस्ते नागरिकांसाठी खुले असावेत, यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही रस्ते तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी खुले ठेवण्याबाबत स्थानिक लष्करी आस्थापना व छावणी मंडळाला सूचित केले होते. असे असताना लष्करी आस्थापना आपल्या स्तरावर रस्ते बंद करण्याची कार्यवाही पुढे नेत आहे. मुळात छावणी परिषद हद्दीत कोणताही रस्ता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंडळाच्या सभेत त्यावर शिक्कामोर्तब करून नागरिकांच्या हरकतीशिवाय बंद करू नये, असा नियम आहे. परिषदेचे सदस्य सचिन ठाकरे यांनीही छावणी मंडळ आणि स्टेशन मुख्यालयास पत्र देऊन त्याचे स्मरण करून देत बंद केलेले रस्ते खुले करण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांना त्रास
यापूर्वी लष्करी आस्थापनाने गोस्वामी मार्ग अशाच प्रकारे बंद केलेला असल्याची तक्रार आहे. छावणी मंडळात २०२१ पासून लोकप्रतिनिधी नाही. यामुळे लष्करी आस्थापनेकडून नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. गोस्वामी मार्ग पाठोपाठ सुशील मार्ग बंद केला जात आहे. देवळालीकरांसह आसपासच्या नागरिकांना हे त्रासदायक ठरते. छावणी परिषदेच्या नोटिसीला नागरिक मोठ्या संख्येने हरकती नोंदवतील. अशी स्थानिकांना अपेक्षा आहे. गतवर्षी गोस्वामी मार्गाला परिषदेने परवानगी दिली असली तरी वरिष्ठ कार्यालयाची अद्याप अंतिम मंजुरी आलेली नाही. तत्पुर्वीच तो मार्ग बंद करण्यात आला. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी येत नाही, तोपर्यंत गोस्वामी मार्ग देखील खुला करावा, अशी मागणी सचिन ठाकरे यांनी केली.