शहरातून तडीपार केलेला गुन्हेगार जेरबंद 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करते. मात्र, शहर व जिल्ह्य़ाबाहेर तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे तेथेच मोकाट फिरत असल्याचे उघडकीस येऊन लागले आहे. शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगाराला शहरातच जेरबंद केल्यानंतर कायदा आणि सुरक्षेव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांत शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभल्याने अनेक टोळ्या उदयास आल्या. वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हाणामाऱ्या, खून आदी घटना नित्याचा भाग बनू लागल्या. या टोळ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी टोळीचा म्होरक्या, त्यांचे साथीदार आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली. त्या अंतर्गत अनेक गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली.  टिप्पर गँगसारख्या काही टोळ्यांनी कारागृहात राहून बाहेर आपले वर्चस्व कायम राहील असे प्रयत्न केले. यामुळे या टोळीतील सदस्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करावी लागली.

गुन्हेगार करत असलेल्या परिसरातील गुन्ह्य़ांच्या कारवायांना लगाम घालण्यात यावा तसेच त्यांना धडा शिकविण्यासाठी पोलीस त्या शहरातून, जिल्ह्य़ातून तडीपारीची कारवाई करतात. नाशिक शहर परिमंडलाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांतर्गत अशा २० सराईत गुन्हेगारांना तडीपार केले गेले आहे. तसेच १७ गुन्हेगारांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी प्रगतिपथावर आहे. मात्र, तडीपारीची कारवाई करूनही काही गुन्हेगार बिनभोबाटपणे शहरात भ्रमंती वा वास्तव्य करीत असल्याचे गेल्या काही वर्षांतील घटनांवरून दिसून येते.

तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी समीर ऊर्फ पप्पी रफिक शेख (३०, रा. कथडा, भद्रकाली) याला नाशिक शहर व ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षे कालावधीसाठी तडीपार केले होते. संशयिताने वैद्यकीय उपचारासाठी महिनाभर शहरात वास्तव्य करू देण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासोबत मुंबई नाका येथील रुग्णालयाची कागदपत्रेही सादर केली होती. शेखला शहरात पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली नसताना तो संबंधित रुग्णालयात उपचार करून शहरात वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. शेखला शहरात वास्तव्य करण्याची कोणी परवानगी दिलेली नव्हती. २२ ऑक्टोबरपासून तो रुग्णालयात औषधोपचार घेत असल्याचे वैद्यकीय कागदपत्रे व सीसी टीव्ही चित्रणावरून निष्पन्न झाले आहे. समीर शेखने तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखच्या शहरातील वास्तव्याने तडीपारीच्या कारवाईतील कमकुवत बाजू नव्याने समोर आल्या आहेत. मुंबई पोलीस कायद्यातील कलमांन्वये ही कारवाई होते. आज शहर वा ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे चौफेर विस्तारलेले आहे. वाहतुकीच्या विविध साधनांची उपलब्धता आहे. यामुळे तडीपार झालेला गुन्हेगार जिथून त्याला तडीपार केले, तिथे भ्रमंती करून पुन्हा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सहजपणे निघून जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर, पोलीस यंत्रणेवर दैनंदिन कामाचा इतका ताण आहे की, तडीपार केलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणे अवघड ठरते.

या स्थितीत तडीपार गुन्हेगारांबद्दल माहिती मिळाल्यावर पोलीस कारवाई करतात. संबंधितांवर गुन्हाही दाखल केला जातो. परंतु, तडीपार गुन्हेगारांच्या भ्रमंतीला कायमस्वरूपी पायबंद बसल्याचे दिसत नाही. त्यातच, भ्रमणध्वनी, समाज माध्यमे यासारखी साधने वाढल्याने गुन्हेगार कुठेही राहून आपल्या समर्थकांना सूचना देऊ शकतात. त्यामुळे तडीपारीच्या कायद्याऐवजी दुसरा सशक्त कायदा करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

परिणामकारकता वाढविण्यासाठी..

मुंबई पोलीस कायद्यांनुसार पोलीस सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करतात. ही कारवाई करताना गुन्हेगाराला ज्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे, तेथील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. संबंधित गुन्हेगाराने त्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली नाही, तर त्याची माहिती त्या पोलीस ठाण्याने ज्या भागात ही कारवाई झाली, तेथील पोलिसांना तातडीने देणे आवश्यक आहे. जेणेकरून तडीपार गुन्हेगाराचा शोध घेणे शक्य होईल. तडीपारीच्या कारवाईची परिणामकारकता वाढविण्यासाठी माहितीचे आदानप्रदान जलदगतीने होण्याची गरज आहे.

अ‍ॅड. धर्मेद्र चव्हाण

तडीपारांविरोधात विशेष मोहीम

 

तडीपारीची कारवाई झाली असताना समीर शेख हा गुन्हेगार शहरात वास्तव्यास असल्याचे आढळले आहे. संबंधिताविरुद्ध तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक शहरात विशेष मोहीम राबवून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

– लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadipaar criminals stay in same place in nashik city
First published on: 01-11-2017 at 00:53 IST