मालेगाव : सेवाज्येष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना १३ वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाला दोन कोटी ६९ लाख ५६ हजार रुपयांना फसविल्याचे प्रकरण येथील मालेगाव हायस्कूलमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि मुख्याध्यापकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात तीन महिन्यात शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधी उघडकीस आलेली ही चौथी घटना आहे.
जैनब मोहम्मद या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, जैनब आणि सीमा तरन्नुम निहाल अहमद या दोन्ही शिक्षिका २०१३ पासून मालेगाव हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत होत्या. या दोन्ही शिक्षिकांना २०२३ मध्ये २० टक्के अनुदान तत्वाचा लाभ देण्यात आला. त्यानंतर याच शाळेत जून २०२४ मध्ये नोकरीस लागलेले अन्य १३ शिक्षक २०१२ ते २०२१ या कालावधीत या शाळेत सेवेत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण अधिकाऱ्यांकडे संच मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यानुसार प्रस्ताव मंजूर झाल्याने या १३ शिक्षकांना १०० टक्के अनुदान लागू झाले. या शिक्षकांच्या मागील तारखेपासून दाखविण्यात आलेल्या सेवेमुळे थकीत वेतनापोटी दोन कोटी ६९ लाख ५६ हजार १९४ रुपयांचा संस्थेने लाभ घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अंजुमन मोईनुतुलबा संस्थेचा चालक मोहम्मद इसाक खलील अहमद, प्राचार्य जाहिद हुसेन, लिपिक नासिर हुसेन, वरिष्ठ लिपिक अबू हुरेरा आणि महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील शिक्षक नवीद अख्तर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील नवीन अख्तरविरोधात अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात त्याला सेवेतून निलंबित केले आहे.
यापूर्वीची प्रकरणे
दोन आठवड्यांपूर्वी काही शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून आणि शिक्षक पात्रता किंवा अभियोग्यता चाचणीच्या अटीतून सुटका मिळावी म्हणून अन्य शिक्षकांची मागील तारखेची नियुक्ती दाखवून फसवणूक केल्याचे प्रकरण स्टुडंट्स एज्युकेशन सोसायटी संचलित स्पेस हायस्कूलमध्ये उघडकीस आल्यासंबंधी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तसेच जूनमध्ये येथील सिटीझन वेल्फेअर एज्युकेशन या संस्थेच्या सरदार प्राथमिक शाळेत अशाच प्रकारे मागील तारखेची शिक्षक नियुक्ती दाखवून वेतन व फरकाची रक्कम घेतल्याने सुमारे अडीच कोटीची फसवणूक झाल्याचा संशय असून याही प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तीन महिन्यांपूर्वी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या लोकमान्य हायस्कूलमध्ये देखील अशाच प्रकारे भरती घोटाळ्याचे प्रकरण पुढे आले होते. त्या संदर्भात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.