नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल माफी न मागितल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी दिल्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांचे हे वैयक्तिक मत असून पक्षाशी त्याचा संबंध नसल्याचे सांगत ठाकरे गटाने अंतर राखले असताना संविधानिक पदावरील व्यक्तीच्या वाहनावर दगडफेकीची धमकी दिल्या प्रकरणी दराडेंविरोधात पोलिसात तक्रार देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी भगूर येथील सावरकर स्मारकास भेट दिल्यानंतर ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख दराडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्या प्रकरणी नाशिक न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. यासाठी त्यांना नाशिकला हजर रहावे लागू शकते. त्यांनी माफी मागावी अन्यथा विरोध केला जाईल. शक्य झाल्यास तोंडाला काळे फासू अथवा त्यांच्या वाहनावर दगडफेक करु, अशी विधाने दराडे यांनी प्रसारमाध्यमांकडे केली. यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दराडे यांची ती व्यक्तिगत भूमिका असल्याचे नमूद केले. त्यांच्यावर कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटातील दुर्लक्षित पदाधिकाऱ्याची ही विधाने लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली आहेत. ठाकरे गटातील नेत्यांनी त्या पदाधिकाऱ्याला फारसे महत्व दिलेले नाही. राहुल गांधी यांच्या सावलीपर्यंत जाण्याची ज्यांची कुवत नाही. त्यांनी दगडफेकीचे भाष्य करणे हास्यास्पद वाटू शकते. परंतु, दगडफेकीची धमकी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सामान्य व्यक्ती असली तरी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. काँग्रेस पोलिसांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीला धमकावणे म्हणजे राज्यात गृह मंत्रालयाचा धाक राहिलेला नाही. – आकाश छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस)