नाशिक – भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यातील संशयित शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याच्या संशयाने अडचणीत आलेले ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करत महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने बडगुजर, साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण यांना नऊ जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर बडगुजर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. बडगुजर यांच्या वकिलाने न्यायालयाकडे बडगुजर यांची गोठवण्यात आलेली बँक खाती खुली करण्याची विनंती केली. ती न्यायालयाने फेटाळली. बँक खाती गोठवलेली राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.