नाशिक : कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (कला) या अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को भागात २३ वर्षांपासून कार्यरत संस्थेच्या वतीने येथील दत्ता पाटील लिखित “हंडाभर चांदण्या” या गाजलेल्या नाटकाचे अमेरिकेतील सॅनहोजे येथे अभिवाचन आणि लेखकाशी संवाद हा उपक्रम उत्साहात पार पडला. सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्साहवर्धक वातावरणात परिसरातील अनेक मराठी रसिकांनी या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
दत्ता पाटील लिखित हंडाभर चांदण्या हे मराठी रंगभूमीवरचे नावाजलेले नाटक आहे. सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे गेली १० वर्ष सातत्याने प्रयोग सुरू आहेत. या नाटकाची कीर्ती अमेरिकेतही पोहोचली. भारतातील विविध ललित कलांचा समृद्ध, सांस्कृतिक वारसा तयार करणे, त्या सादर करणे आणि जतन करणे हा कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनचा हेतू आहे. दरवर्षी दोन नाटके, चार एकांकिका या संस्थेच्या कलावंतांकडून अमेरिकेत सादर केल्या जातात.
कार्यक्रमांमधून मिळणारे उत्पन्न भारतातील उच्च दर्जाच्या रंगमंच सादरीकरणांचे संग्रहण करण्यासाठी वापरले जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून नाटककार पाटील यांना संस्थेने कॅलिफोर्नियात निमंत्रित केले. सॅनहोजे येथे स्थायिक असलेले असोसिएशनचे सचिव तथा कोषाध्यक्ष मुकुंद मराठे यांच्या संकल्पनेतून ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचे अभिवाचन अमेरिकेत नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या कलावंतांच्या माध्यमातून सॅन्डबॉक्स या नाट्यउपक्रमांतर्गत सादर करण्यात आले. यावेळी दत्ता पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
अभिवाचनाचे दिग्दर्शन अवधूत भांबारे यांनी केले. संस्थेचे हेमांगी वाडेकर, आनंद घाणेकर, शिरीष साठे यांच्या संयोजनातून झालेल्या या अभिवाचनात मिलींद कुलकर्णी, प्रशांत शिंदगीकर, स्नेहा घारपुरे, नीरज कुलकर्णी, प्रियंका निमकर, श्रीपाद तोरवी आणि भांबारे हे स्वत: सहभागी झाले होते. मराठे यांच्या हस्ते दत्ता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील गाजलेली व्यावसायिक नाटके अमेरिकेत निमंत्रित करण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू आहेच, परंतु ‘कला’सारख्या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील समांतर प्रायोगिक रंगभूमीवरच्या प्रयत्नांनाही निमंत्रित करून एक प्रकारे हा प्रायोगिक रंगभूमीचा बहुमानच केला आहे, अशा शब्दांत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रसिक प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.