लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: महापालिका सदस्यांची मुदत रविवारी संपत आहे. मात्र, अजूनही निवडणूक जाहीर झालेली नाही. राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महापालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यासंदर्भातील आदेश शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाला प्राप्त झाला. आता महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून कार्यभार आला आहे. महापौरांनी शेवटची महासभा घेण्याची व्यक्त केलेली इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही.

राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहित वेळत घेणे शक्य होणार नसल्याचे, तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत आदेशातून कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेची मुदत पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे संबंधित मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार १७ सप्टेंबरला मुदत संपत असलेल्या महापालिकेत प्रशासकपदावर आयुक्तांची नियुक्ती करण्यात येत आहे.

हेही वाचा… जळगावकरांच्या सेवेत लवकरच ई-बस; जिल्हाधिकार्यांकडून थांब्यांसाठी जागांची पाहणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्तांनी महापालिकेची विहित मुदत संपल्यापासून प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारावा, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी हे आदेश काढले आहेत.