जवळपास ३० कोटींच्या थकीत कर्जापोटी मालेगाव येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेची सूतगिरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सरफेसी २००२ कायद्यांतर्गत जप्त केली असून लिलावाद्वारे तिच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. उपरोक्त संस्थेत पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीचा आप्त जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना हे कर्ज वाटप झाल्याचे सांगितले जाते. जामिनकीच्या हमी पत्रानुसार संचालकांविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा- सातारा : अतिसंवेदनशील कास पठारावर हेलिकॉप्टर उतरल्याने खळबळ

जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्ज वसुलीवर भर दिला आहे. त्या अंतर्गत मालेगावच्या द्याने येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेची मालमत्ता जप्त केली गेली होती. या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्रीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख पाच जानेवारी असून सहा तारखेला निविदा उघडल्या जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा- “शी-शी-शी, नारायण राणेंकडे आम्ही…”, आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगावच्या राजकीय क्षेत्रातील वजनदार कुटुंबातील एक व्यक्ती रेणुकादेवी सहकारी संस्थेत पदाधिकारी होती. याच कुटुंबातील एक व्यक्ती जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना त्या संस्थेला कर्जवाटप झाल्याचे बँकेकडून सांगितले जाते. रेणुकादेवी औद्योगिक संस्थेची मालेगावच्या द्याने येथे सूतगिरणी आहे. या संस्थेकडे सात कोटी ४६ लाखाचे मुद्दल व २२ कोटी १५ लाखाचे व्याज थकीत आहे. संस्थेकडून कर्जाची परतफेड झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर बँकेेने संस्थेची मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या मालमत्तेचा आता लिलाव करण्यात येणार आहे. दरम्यान वैयक्तीक व सामुहिक दिलेल्या जामिनकीच्या हमीपत्रानुसार संचालकांविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली. तसेच संचालकांविरोधात सहकार न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे.