जळगाव: केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल सत्कार समारंभ आणि मुलाखतींचा ओघ अजूनही सुरू असल्याने कुठल्याही प्रकारे डोक्यात हवा जाऊ न देता, आपण कुठून आलो, याचे भान ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्याकडे पाहुन पाय जमिनीवर असणे म्हणजे काय असते, याची प्रचिती जळगावकरांना नुकतीच आली. प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला हा माणूस रस्त्यावरून चक्क डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन जाताना पाहुन जळगावकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
जल, जंगल आणि जमीन यासाठी झटणारे चैत्राम पवार यांचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांचे आयुष्य, विचार आणि कृती यामध्ये एक विशेष प्रकारचा समतोल आणि स्पष्टता दिसून येते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शहराकडे न जाता आपले मूळ गाव बारीपाडा आणि तेथील निसर्ग आणि शेती आपली कर्मभूमी मानली.
त्यांच्या वागण्या-बोलण्यातील सौम्यपणा, कोणताही दिखावा न करता साधेपणाने जीवन जगण्याची वृत्ती, आणि नेहमीच ‘मी’ पणा टाळून ‘आपलेपणाचा आग्रह, ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये. त्यांनी बारीपाड्यातील आदिवासींना नवी पहाट दाखविण्यासाठी केलेली धडपड सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ते स्वतः कधीच हे सर्व मी केले म्हणून सांगत नाही, उलट हे सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले, असे नम्रपणे सांगतात.
चैत्राम पवार यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने गौरविले, त्यानंतर केंद्र सरकारनेही त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. परंतु, दोन्ही पुरस्कार त्यांच्या वागणुकीत, स्वभावात किंवा जीवनशैलीत किंचितही बदल घडवून आणू शकले नाहीत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे जळगाव रेल्वे स्थानकावरील नुकताच घडलेला प्रसंग. लांबच्या प्रवासासा जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी स्वतः बरोबर आणलेले सामानाचे गाठोडे थेट डोक्यावर घेतले. कोणी आपल्याला पाहून घेईल म्हणून चेहरा न लपवता अत्यंत सहजतेने चालत गेले. प्रसिद्धी, मान-सन्मान यांच्या झगमगाटात हरवून जाण्याऐवजी मातीशी घट्ट नाते जपण्याचा अनोखा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.
पती-पत्नी दोघे मुलास भेटण्यासाठी ओडिशाला रेल्वेने चाललो होतो. जळगाव स्थानकावर पोहोचल्यानंतर बरोबर आणलेले सामानाचे गाठोडे कोणीतरी एकाने डोक्यावर घेणे आवश्यक होते. तो भार आपणच का उचलू नये, असा विचार केला. आणि गाठोडे डोक्यावर घेतले. – चैत्राम पवार (सामाजिक कार्यकर्ते, बारीपाडा, जि. धुळे)