नाशिकहून दोन तास ५५ मिनिटांत मुंबई; रेल्वे मार्गावर विशेष व्यवस्थेचे काम

मनमाड : आगामी वर्षभरात रेल्वेने नाशिकरोडहून मुंबईला दोन तास ५५ मिनिटांत तर, मनमाडहून नाशिकरोडला अवघ्या ४५ मिनिटांत आणि मुंबईला पावणे चार तासात पोहचता येणे शक्य होणार आहे. प्रवासी गाडय़ांचा वेग वाढणार असल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीचे ‘थिक वेब स्वीच’ लोहमार्गावर बसविणे सुरू केले आहे.

मध्य रेल्वेने आपल्या प्रवासी गाडय़ांचा प्रामुख्याने मेल आणि एक्स्प्रेसचा सध्या सर्वसाधारणपणे असलेला ताशी ११० ते १२० किलोमीटरचा वेग वाढवून तो १४० ते १६० करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आगामी काळात प्रवासातील वेळेची सुमारे २५ टक्के  बचत होणार आहे. तसेच माल वाहतुकीसाठीही रेल्वेची क्षमता वाढीची योजना असून अधिक भार सहन करण्याची क्षमता वाढेल, अशी यंत्रणा लोहमार्गावर बसविली जात आहे. सध्या जेथे रेल्वेचे सांधे बदलतात, त्याठिकाणी म्हणजे प्रामुख्याने इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगांव आणि भुसावळ या स्थानकांत सांधे बदलताना गाडय़ांचा वेग कमी करावा लागतो. बोगीतील प्रवाशांना झटका बसतो. यापुढे वेग वाढल्यानंतर

सांधे बदलताना हा धक्का बसू नये म्हणून सध्याच्या सामान्य ‘स्वीच’ऐवजी ‘थिक वेब स्वीच’ बसविण्यात येत आहेत.

या अत्याधुनिक यंत्रणेमुळे प्रवासी गाडय़ांचा वेग ताशी १५० ते १६० किलोमीटर झाल्यावरही सांधे बदल होताना गाडीतील प्रवाशांना कोणताही धक्का बसणार नाही. भुसावळ विभागात गेल्या वर्षभरात प्रायोगिक तत्त्वावर १९० ‘थिक वेब स्वीच’ बसविण्यात आले आहेत. भुसावळ-इगतपुरी रेल्वे मार्गावरही हे स्विच बसविण्यात येत असून त्याची चाचणी सुरू आहे. या प्रत्येक स्विचची किंमत एक लाख ५० हजार रुपये आहे.

पंचवटीला पावणेचार तास

सध्या उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची जीवन वाहिनी असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला मनमाड ते सीएसटी मुंबई या २४४ किलोमीटरच्या प्रवासासाठी चार तास ३५ मिनिटे लागतात. आगामी  काळात अवघ्या तीन तास ४५ मिनिटांत हे अंतर कापता येण्यासाठीची रेल्वेची योजना आहे. मनमाड-नाशिक रोड या ७४ किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या या गाडीला ५७ मिनिटे लागतात. ही वेळ कमी होऊन अवघ्या ४५ मिनिटांत मनमाडहून नाशिक रोडला पंचवटीने पोहचता येणे शक्य होणार आहे. नाशिक रोडहून मुंबईला दोन तास ५५ मिनिटात पंचवटी एक्स्प्रेस प्रवाशांना सोडेल.

सध्याच्या ‘स्विच’पेक्षा तीन पटीने सुरक्षित असे हे ‘थिक वेब स्विच’ असून सध्या भुसावळ विभागात १९० ठिकाणी ते बसविण्यात आले आहे. त्यामुळे आगामी  काळात प्रवाशांना धक्के  न बसता त्यावरून ताशी १४० ते १६० किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे ही सुरक्षितपणे धावू शकेल.

विवेककुमार गुप्ता (रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग)