लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : द्राक्ष खरेदीत यापूर्वी व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या प्रकरणात नवीन गुन्हे दाखल करून त्यामध्ये फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर त्यांना मदत करणारे स्थानिक लोक, दलाल व वाहतूकदारांनाही आरोपी करण्याची तयारी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात तीन वर्षात सुमारे १२०० शेतकऱ्यांची ४७ कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. या विषयावर अलीकडेच कृषिमंत्री माणिक कोकाटे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी संशयित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केली.

आणखी वाचा-मनोरुग्ण मुलाच्या मृत्युच्या धक्क्याने महिलेचाही मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात ग्रामीण पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तयारी केली आहे. द्राक्ष हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी अनोळखी व्यापाऱ्याला माल देऊ नये. जो व्यापारी शेतकऱ्यांकडे माल घ्यायला येईल, त्याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. संबंधित व्यापाऱ्याची पोलीस ठाण्यामार्फत पडताळणी केली जाईल. जेणेकरून व्यापाऱ्यावर अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत का याची स्पष्टता होईल. फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी बळीराजा मदतवाहिनीचा वापर करावा. पोलीस दलातर्फे त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी म्हटले आहे. शेतकरी फसवणुकीबाबत पणन व कृषी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या विषयावर दर तीन आठवड्यांनी आढावा बैठक घेतली जाणार आहे.