गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असला तरी मांसाची विक्री वा वाहतूक राज्यातून सहजपणे होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. तामिळनाडूहून २० हजारहून अधिक किलो मांस आणि जनावरांची कातडी घेऊन निघालेली मालमोटार नाशिकरोडच्या दत्त मंदिर चौकात पकडण्यात आली. पकडलेल्या मालाची किंमत २६ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या स्थितीत राज्यातून गोमांसाची वाहतूक आणि विक्री केली जात असल्याचे स्थानिकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आले.
मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकात उभ्या असणाऱ्या मालमोटारीत मांस व जनावरांचे कातडे असल्याचे निष्पन्न झाल्यावर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने तातडीने धाव घेऊन मालमोटारीची तपासणी केली.
त्या वेळी त्यात हजारो किलो मांस आणि जनावरांची शेकडो कातडी असल्याचे निदर्शनास आले. मालमोटारीतील संशयित जयराम हरी वीरप्पन पलानी, पलानी मुत्तू स्वामी, सय्यत्द मोबिन तायर, जुबेर बिस्मिला खान, अब्दुल बारी कलाम, रौफ रफी कुरेश, सईद अजिज खान या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील काही जण स्थानिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधितांकडे वाहतुकीचा परवाना आणि इतर कागदपत्रे मागितली असता त्यांनी ती उपलब्ध केली नाहीत.
उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यावर मालमोटार उपनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. या कारवाईत सुमारे साडेसोळा लाखांचे मांस व कातडे हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रारंभी पोलीस यंत्रणा हे गोमांस आहे की नाही याबद्दल अनभिज्ञ होती.
पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे असल्याने आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेने शहर व परिसरात गोमांसाची अवैधरीत्या वाहतूक तसेच विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटक केलेल्यांत काही स्थानिकांचाही समावेश असल्याने पोलीस अधिक छाननी करत आहे.