भ्रमणध्वनीद्वारे अश्लील छायाचित्र काढून पाच लाखांची खंडणी आणि भूखंड नावावर करण्यासाठी एका वृद्धेला धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश असून या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.
देवीचा मळा भागातील वृद्धेने या संदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार शकील अहमद अब्दुल कय्युम, तव्वाबे नावाची एक व्यक्ती आणि त्याची पत्नी रेश्मा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिघांनी भ्रमणध्वनीद्वारे बेमालूमपणे या वृद्धेचे अश्लील छायाचित्र काढून घेतले. नंतर तिला गाठून पाच लाखांची खंडणीची मागणी त्यांनी सुरू केली. तसेच तिच्या नातेवाईकाचा भूखंड नावावर करण्याचा आग्रह धरला. तसे केले नाही तर भ्रमणध्वनीत असणारे छायाचित्र सर्वत्र दाखवून बदनामी करू असा दम देतानाच बळजबरीने भूखंडाचे मुखत्यारपत्रही त्यांनी तिच्याकडून करवून घेतले.
या प्रकाराला वैतागलेल्या वृद्धेने अखेरीस मोठे धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर तिने खंडणीखोरांकडून पैशांसाठी छळ करण्यात आल्याची माहिती पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणाचा योग्य तो तपास करून यातील संशयितांना ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
वृद्धेला बदनामीची धमकी देणाऱ्या खंडणीखोरांविरुद्ध गुन्हा दाखल
संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश असून या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-02-2016 at 01:21 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three accused booked for demanding ransom money