धुळे – उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाचखोरांना ताब्यात घेतले. त्यात शिरपूर येथील पंचायत समिती विस्तार अधिकारी, साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळाधिकारी आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराचा समावेश आहे.

शिरपूर पंचायत समितीमध्ये डी. बी. पाटील हा विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने बिरसा मुंडा जलक्रांती अभियानांतर्गत अनुदान दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने शिरपूरमधील कन्या विद्यालयाशेजारील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच घेताना पाटील यास पकडले.

हेही वाचा >>>गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

तसेच साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळाधिकारी विजय बावा याने शेत जमिनीच्या वाटणीचे काम करुन देण्यासाठी भामेर गावातील तक्रारदाराकडे १८ हजार रुपयांची मागणी केली होती. आठ हजार रुपये घेतल्यानंतरही उर्वरीत रकमेसाठी बावा याने शेत जमिनीची वाटणी केली नाही. यामुळे तक्रारदाराने बुधवारी सायंकाळी बावाला घरी बोलवून उर्वरीत रक्कम देतो, असे सांगितले. त्यानुसार बावा तक्रारदाराच्या घरी गेला. तेथे सात हजार रुपयांची लाच घेताना मंडळाधिकारी बावाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>दहावी, बारावीत विद्यार्थी नापास झाल्यास पगारवाढ बंद; आश्रमशाळा शिक्षकांना आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा

जळगाव जिल्ह्यात शेतातील वीजमोटार चोरी प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ येथील तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी कडले. गणेश गव्हाळे (रा. जामनेर) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे परिसरातील शेतकरी असून, त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या शेतात वीजमोटार लावण्यात आली होती. त्यातील एका शेतकर्याची पाच हजार रुपये किमतीची वीजमोटार नुकतीच चोरीला गेली होती. यानंतर कुर्हे बीटचे हवालदार गव्हाळे यांनी शेतकर्याच्या तोंडी तक्रारीवरून तक्रारदार शेतकर्याशी चर्चा करीत संबंधित शेतकर्याचा तुमच्यावर वीजमोटार चोरीचा संशय असून, प्रकरण मिटविण्यासाठी एक हजार, तर मोटारचोरीपोटी पाच हजार रुपये संबंधित शेतकर्याला देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दिली. विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात पथक नियुक्त केले. दरम्यान, हवालदार गव्हाळे यांची बुधवारी रात्रीची गस्त होती. गुरुवारी सकाळी कामाची वेळ संपल्यानंतर गव्हाळे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी मांडवेदिगर फाट्यावर बोलाविले. तेथे शेतकर्याकडून सहा हजारांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हवालदार गव्हाळे यांना अटक केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.