जळगाव – तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गुरुवारी  विषप्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आईसह मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडली गावात नारायण पाटील (६६) हे पत्नी भारती  पाटील (५५) आणि मुलगा गणेश पाटील (३३) यांच्यासोबत वास्तव्याला होते. काही दिवसांपासून पाटील कुटुंबीय तणावात होते.

हेही वाचा >>> जळगाव : भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर नागरी वस्तीत; मुलगी जागीच ठार

गुरुवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती व मुलगा गणेश यांनी घरात असताना विषारी औषध सेवन केले. त्यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्याम याला भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत घरी येण्यास सांगितले. श्याम हा घरी गेल्यावर मित्र गणेश याच्यासह त्याचे आई-वडील हे एकमेकांच्या गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्याम याने ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तिघांपैकी नारायण पाटील यांचा सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश यांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांनी अचानकपणे टोकाचे पाऊ उचलण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.