नाशिक – जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरण, तलावासह अन्य पाण्याची ठिकाणे भरली आहेत. जिल्ह्यात अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यातील पोही येथील रमेश मोरे (५०) हे मन्याड नदीपात्रातून शेतात वीज जोडणीसाठी विद्युत वायर ओढत असतांना पाय घसरून ते नदीपात्रात पडले. हा प्रकार परिसरातील अन्य लोकांच्या लक्षात येताच त्यांनी मोरे यांना पाण्यातून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना दिंडोरी तालुक्यात घडली. शिवाजी गांगोडे (५५, रा. नळवाडी) हे शिवारातील करंजवण धरणाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना बागलाण तालुक्यात घडली. देविदास भामरे (४५, रा. पिंगळवाडे) हे शेत शिवारात साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी पाण्यातून त्यांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक जिल्हा परिसरात मागील सहा महिन्यात पाण्यात पडल्याने २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हात आधी पाणी टंचाई असल्याने खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी, शेती मधील शेततळ्या परिसरात काम करत असतांना, काही मासेमारी वा अन्य कामासाठी जात असतांना २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसरीकडे, पावसाळ्यात नदी, धरण तसेच धबधबा परिसरात होणारे पर्यटन पाहता प्रशासनाच्या वतीने पावसाळी पर्यटनावर निर्बंध आणली आहे. मात्र पर्यटकांकडून धरण परिसरात हुल्लडबाजी सुरू असून काही धरण परिसराच्या पाण्यात बुडाले.