धुळे – मयताच्या सदऱ्याच्या खिशातील चुरगळलेल्या कागदावर लिहिलेल्या शेवटच्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकावरुन कौशल्याने थाळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने हत्येप्रकरणी संयुक्तपणे तपास करुन विधीसंघर्षित बालकासह तीन जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरपूर-गरताड रस्त्यावर पाच मे रोजी एक मृतदेह आढळला. प्राथमिक पाहणीत मारहाण करुन रुमालाने गळा आवळल्याचे निदर्शनास आले. संबधिताची हत्या करुन मृतदेह शेतात टाकून मारेकरी पळून गेले होते. या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मृतदेह सापडल्यापासून गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. नऊ मे रोजी तपास अधिकारी सहायक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी मयताच्या अंगावरील जप्त कपड्यांची तपासणी केली असता सदऱ्याच्या खिशात कागदाचे तुकडे झालेली चिट्टी मिळाली. या चिट्ठीवर असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकातील शेवटचे दोन अंक जुळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
शेवटचा अंक ५६ असल्याची खात्री झाल्यावर त्या क्रमांकाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. संबंधित क्रमांकाचा भ्रमणध्वनी संजय कनोज (हल्ली मुक्काम ब्राम्हणे, ता. शिंदखेडा) हा वापरत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे तपास केल्यावर संबंधित भ्रमणध्वनी क्रमांक त्याचा पुतण्या दयाराम कनोज याचा असल्याचे कळाले. दयाराम हा मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात झरीमाता येथे गेल्याचे समजल्यावर थाळनेर पोलीस आणि गुन्हे शाखेतील कर्मचारी असे पथक मध्य प्रदेशात पोहचले. तेथील दोघांना मृताचे छायाचित्र दाखविले असता त्यांनी संबंधित व्यक्ती हा त्यांचा पाहुणा उमेश ऊर्फ राहुल चौहान ( रा. उपला, जि.बडवानी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम मधुकर चित्र मंदीरजवळ, नरडाणा, जळगाव) हा असल्याची माहिती पोलिसांना दिली.
नंतर पोलिसांनी १२ मे रोजी नरडाणा गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले असता आकाश पावरा हा मयत उमेश चौहान बरोबर असल्याचे दिसले. शिरपूर तालुक्यातील निमझरी रोड येथून आकाश यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता साथीदार दिलीप पावरा, घनदास ऊर्फ गुड्ड पावरा आणि लहान भाऊ विधीसंघर्षीत बालक यांनी एकत्र येऊन उमेश ऊर्फ राहुल याची हत्या केल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलीप पावरा आणि विधीसंघर्षित बालक यांना नरडाणा येथून तर घनदास यास मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील भुरापाणी येथून ताब्यात घेतले. उमेश ऊर्फ राहुलने विधीसंघर्षीत बालकास शेतात मजूर पाठविण्याच्या कारणावरुन मारहाण केली होती. तर, घनदास ऊर्फ गुड्डु यास जुन्या भांडणाच्या वादातून महिन्यापूर्वी नरडाणा येथील घरात घुसुन मारहाण केली होती, या घटनांचा बदला म्हणून घनदास ऊर्फ गुड्डु जाधव-पावरा (३६), दिलीप पावरा (२१), आकाश पावरा (१९) आणि १७ वर्षाच्या विधीसंघर्षीत बालकास (सर्व रा.नरडाणा,.शिंदखेडा) यांनी चार मे रोजी रात्री उमेश याची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर आकाशने उमेश यास नरडाण्याहून मध्यरात्री शिरपूर येथे आणले. दिलीप, विधीसंघर्षीत बालक हे घनदास ऊर्फ गुड्डु याच्याबरोबर मोटार सायकलने शिरपूर येथे आले. गरताड रोडवरील हॉटेल सनी गार्डनपुढे रस्त्यालगत शेतात उमेश यास मारहाण करण्यात आली. रुमालाने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यास शेतात फेकून मारेकऱ्यांनी पळ काढला.याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना नरडाणा आणि मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. विधीसंघर्षीत बालकाच्या वयाची तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे