नाशिक : सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहेत. बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे. या संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिसरातील तीन महिलांनी गोदाकाठावरील भांडी बाजारातील एका दुकानातून पितळी गणपती मूर्ती आणि चार हत्ती लंपास केले. चोरीचा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यावर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने तीनही संशयित महिलांना नाशिक सोडण्याआधीच ताब्यात घेतले.

सध्या गौरी गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्रााहकांची लगबग वाढली आहे. या गर्दीत चोरट्यांकडून हातसफाई करण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास भांडेबाजारातील गिरीश शेटे यांच्या दुकानात असलेल्या गर्दीची संधी साधत चोरट्यांनी गणपती आणि चार पितळाच्या हत्तीच्या मूर्ती चोरल्या. पोलीस चोरट्यांचा माग काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे (एक) हवालदार संदीप भांड यांना गुन्ह्याशी संबंधित महत्वाची माहिती मिळाली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण, काही लोकांशी चर्चा केल्यानंतर या चोरीत काही महिलांचा सहभाग असून त्या नवीन मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेने पायी गेल्याचे समजले. संशयित महिला संभाजीनगरकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मेळा बस स्थानक परिसरात आले. पथकात काही महिला पोलीस कर्मचारी होत्या. त्यांनी प्रवासी असल्याचे भासवत संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. संशयास्पद तीन महिला संभाजी नगर बसमध्ये बसल्या होत्या. तिघींना त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या जवळच्या सामानाची तपासणी केली असता एक पितळी गणेश मूर्ती आणि चार हत्ती अंदाजे किंमत १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे सुमनबाई जाधव (५५), फुलाबाई गायकवाड (३५) आणि कमलबाई जाधव (४५) अशी आहेत. या तिघी छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडीतील संजयनगरच्या रहिवासी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलांसह मुद्देमाल सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिला. ही कारवाई निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार संदीप भांड, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, मिलिंदसिंग परदेशी, नाझमखान पठाण, विशाल देवरे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, अनुजा येवले आणि समाधान पवार आदींच्या पथकाने केली.