मालेगाव : पाकिस्तानविरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी मालेगाव येथे ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी झालेल्या मुस्लिम समुदायाने ‘हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
देशातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणेकडून एकिकडे सावधगिरी बाळगण्यात येत असताना भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागरिकांची एकजूट दिसू लागली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनही साथ मिळू लागली आहे. संवेदनशील अशा मालेगाव शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विविध पक्षांचे तसेच सामाजिक,धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत ही यात्रा काढण्यात आली. मालेगाव येथील मुशावरात चौकापासून सुरू झालेल्या यात्रेचा किदवाई रस्त्यावर समारोप झाला. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात भारतातील मुस्लिम समुदायाने खांद्याला खांद्या लावून लढा दिला. आणि फाळणीच्या वेळी भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाता हिंदुस्तानच्या भूमीलाच आपले मानले, असे यावेळी मौलाना मुफ्ती यांनी सांगितले. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे,भारताच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत रहावा,अशीच मुस्लिम समुदायाची भूमिका असून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने जी खंबीर भूमिका घेतली ती योग्य असल्याचे तसेच भारतीय लष्कर दाखवत असलेले शौर्य अभिमानास्पद असल्याचे मुफ्ती यांनी नमूद केले. या यात्रेत शफीक राणा, युसुफ इलियासी,सिकंदर अन्सारी, इत्तेशाद बेकरीवाले आदी सामील झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी नागरी संरक्षण दलाच्या वतीने नाशिक येथील रामकुंड परिसरात सुरक्षाविषयक सराव करण्यात आला होता. नागरी संरक्षण दलाच्या वतीने याआधी के.टी.एच.एम. महाविद्यालयातील बोट क्लब परिसरात प्रात्यक्षिक करण्यात आले होते. शुक्रवारी रामकुंड परिसरात सराव करण्यात आला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना वेठीस धरल्यास काय करता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भोंगा वाजल्यानंतर प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. अतिरेकी कुठे लपल्यास काय करता येईल, आगीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, जखमी लोकांना तातडीने आरोग्य सेवा देण्यासाठी कशाप्रकारे हालचाली केल्या जाऊ शकतात, ते दाखविण्यात आले. हा सराव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. केंद्र पातळीवरून आलेल्या सूचनेनुसार रेल्वे स्थानक, बस स्थानक यासह गर्दीची ठिकाणे, संवेदनशील स्थळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नाकाबंदी, अडवून तपासणी असे उपाय केले जात आहेत.