नाशिक : ऐन उन्हाळ्यात शहरातील अनेक भागात वितरणातील समस्यांमुळे पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असताना महापालिकेने प्रभाग क्रमांक १२ मधील ही समस्या दूर करण्यासाठी जलकुंभ भरण्यासह पाणी पुरवठा वितरणाच्या वेळेत प्रायोगिक तत्वावर बदल केले आहेत. या माध्यमातून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. महात्मानगर जलकुंभावरून आधी सकाळ व सायंकाळ प्रत्येकी दोन तास पाणी पुरवठा होत असे. आता केवळ संध्याकाळी तीन तास पाणी पुरवठा केला जाणार आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये नाशिक पश्चिम विभागातील तिडके कॉलनी परिसरातील स्त्री मंडळ, लव्हाटेनगर आणि महात्मानगर जलकुंभ शिवाजीनगरच्या जलशुध्दीकरण केंद्रातील जलवाहिनीवरून भरले जातात. काही दिवसांपासून उपरोक्त जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत असून जलकुंभ पुरेशा प्रमाणात भरले जात नसल्याचे समोर आले होते. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने जलशुद्धीकरण उपलब्ध पाण्याचे फेरनियोजन केले. जलकुंभाची भरण्याची वेळ आणि परिसरात पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आले. त्यानुसार स्त्री मंडळ जलकुंभावरून सध्याची वितरणाची वेळ सायंकाळी सहा ते आठ असून लव्हाटेनगर जलकुंभावरून ही वेळ संध्याकाळी साडेपाच ते साडेसात आहे. या दोन्ही जलकुंभावरील पाणी वितरणाच्या वेळेत बदल झालेले नाहीत. परंतु, महात्मानगर जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला. या जलकुंभावरून सध्या सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ असे पाणी वितरण केले जाते. आता संध्याकाळी पाच ते आठ या सुधारीत वेळेनुसार पाणी पुरवठा होईल.

पाणी पुरवठ्यात तासाभराची कात्री

महात्मानगर जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल झाला आहे. यापूर्वी सकाळ व सायंकाळ या जलकुंभावरून पाणी पुरवठा होत असे. आता तो केवळ संध्याकाळी होणार आहे. आधीच्या दिवसभरातील चार तासांच्या तुलनेत आता तीन तास पाणी पुरवठा होईल. पाणी पुरवठ्याच्या वेळेत झालेल्या बदलाची महात्मानगर, कामगार नगर, पारिजात नगर, सुयोजित नगर आदी भागातील नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे. असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.