जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर सोने आणि चांदीचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांसह व्यावसायिक बाळगून होते. परंतु, शनिवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा तेजी दिसून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

सणासुदीच्या काळात देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होताना दिसून आले. तशात छठ पुजेच्या सणामुळे शनिवारी सोन्याच्या किमतीत आणखी वाढ झाली. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही वाढ नोंदवली गेली. देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना, धनत्रयोदशीसह लक्ष्मीपूजनाला ज्यांनी सोने किंवा चांदी खरेदी केली होती, त्यांना ते विकावे की ठेवावे असा प्रश्न आता पडला आहे.

खरे तर गेल्या काही दिवसातील सोन्याच्या वाढत्या किमतींमागे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी केलेली विक्रमी खरेदी, हे एक प्रमुख कारण होते. जगभरातील मध्यवर्ती बँका सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त सोने खरेदी करत आहेत. आणि ते २०२५ मध्ये जवळपास ९०० टन सोने खरेदी करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अलीकडच्या काळात पीपल्स बँक ऑफ चायना ही सोन्याची सर्वात मोठी खरेदीदार बनली आहे. अर्थतज्ज्ञ या खरेदीला संभाव्य अमेरिकन निर्बंधांपासून संरक्षण करण्यासाठी आणि ब्रिक्स गटात डॉलरशिवाय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीच्या मोठ्या धोरणाचा भाग म्हणून पाहतात.

जळगाव शहरातही १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर सोने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक लाख ३२ हजार ८७० रूपयांपर्यंत, तर बालिप्रतिपदेला एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले. मात्र, भाऊबीजेला पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत वधारले. अर्थात, दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत घसरले. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा ९२७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २७ हजार ६१७ रूपयांपर्यंत पोहोचले.

चांदीत १०३० रूपयांनी वाढ

शहरात १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, लक्ष्मीपूजनापर्यंत चांदीचे दर एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत खाली आले. नंतरही घसरण सुरू राहिल्याने बालिप्रतिपदेला चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत घसरली. भाऊबीजेच्या दिवशी कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत घसरली. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ५७ हजार ५९० रूपयांपर्यंत पोहोचले.