जळगाव – शहरातील सराफ बाजार अक्षय्य तृतीयेनंतर सोने दरात बऱ्यापैकी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी दिवसभरात १८५४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ६७४ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना त्यामुळे धक्का बसला आहे.
जळगावमध्ये अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने दरात सातत्याने वाढ नोंदविण्यात आल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक कमालीचे धास्तावले होते. परंतु, अक्षय्य तृतीयेनंतर दरातील घट कायम राहिल्याने शनिवारपर्यंत सोने जीएसटीसह ९६ हजार ८२० रुपयांपर्यंत घसरले होते. एकूण चित्र लक्षात घेता सोने दरातील घसरण यापुढेही अशीच कायम राहण्याची शक्यता व्यक्त झाली होती. मात्र, सोमवारी बाजार उघडताच शनिवारच्या तुलनेत २०६ रुपयांची वाढ सोने दरात नोंदविण्यात आली. तेवढ्यावरच न थांबता दुपारनंतर सोने दराने पुन्हा १६४८ रुपयांची उसळी घेतली. एकाच दिवसात १८५४ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर ९८ हजारावर पोहोचले.
अमेरिकेतील व्यापार करारांबाबत सुरू असलेली अनिश्चितता, तसेच धोरणांमध्ये सातत्याने होणारे बदल यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीकडे वळत आहेत. डॉलरच्या कमजोरीमुळेही दर वाढले असून, सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावरील तणाव, व्यापार युद्धाचा धोका आणि अमेरिकेतील महागाईबाबत असलेली अनिश्चितता यामुळे मध्यवर्ती बँका पुढील काही दिवस सोन्याची खरेदी सुरूच ठेवतील. परिणामी, सोन्याच्या किंमती आणखी वधारतील, असे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदीचे दर स्थिर जळगावमध्ये शनिवारी २०६० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले होते. सोमवारी दिवसभरात कोणतीही वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर स्थिरच राहिले. त्यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला.