जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून सातत्याने तेजीत असलेल्या सोने, चांदीच्या दराने दसऱ्याच्या एक दिवस आधी बुधवारी पुन्हा उसळी घेतली. विशेषतः चांदीने आदल्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढून नवा विक्रम केला.

ऑक्टोबरची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी एका नवीन संकेताने झाली आहे. जागतिक अनिश्चितता आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीसारख्या धातुंकडे सुरक्षित गुंतवणुकीच्या हिशेबाने पाहणाऱ्यांची ओढ वाढली आहे. अमेरिकेतील शुल्क धोरणे, मध्य पूर्वेतील संघर्ष आणि मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर धोरणांवर सतत नजर ठेवली जात आहे. या सर्व घटकांमुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. या कारणाने दोन्ही धातुंच्या किमती दिवाळीपर्यंत तेजीत राहण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आहे.

जळगावमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १ लाख १९ हजार ६८६ रूपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १५४५ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने एक लाख २१ हजार २३१ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. परंतु, दुपारनंतर सकाळी जेवढे दर वाढले होते तेवढे कमी झाले. त्यामुळे सोने एक लाख १९ हजार ६८६ रूपयांवर स्थिरावले. महिन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात पुन्हा १२३६ रूपयांची वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे सोने जीएसटीसह एक लाख २० हजार ९२२ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

अशाच प्रकारे शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ५० हजार ३८० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने एक लाख ५१ हजार ४१० रूपयांचा नवीन उच्चांक केला. मात्र, दुपारनंतर सकाळी जेवढे दर वाढले होते, तेवढे कमी झाले. त्यामुळे चांदी एक लाख ५० हजार ३८० रूपयांवर स्थिरावली होती. मात्र, बुधवारी सकाळी बाजार उघताच पुन्हा वाढ नोंदवली गेल्याने चांदीने पुन्हा नवा विक्रम केला. दीड लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतरही चांदीची विक्रमी दरवाढ कायम असल्याने ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत.

चांदीत १०३० रूपयांनी वाढ

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५० हजार ३८० रूपयांच्या उच्चांकावर होते. बुधवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीने एक लाख ५१ हजार ४१० रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.