नाशिक – शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम असून या ठिकाणी नाशिक शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी किराणा माल तसेच मिरची, मसाले, तांदूळ, सुकामेवा यांसह भुसार मालाची साठवणूक केली आहे. महामंडळाचे हे गोदाम भाडेतत्त्वावर नवी दिल्लीनजीक असलेल्या गाजियाबाद येथील ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदाराने भाड्याचे पैसे थकविल्यामुळे महामंडळाने गोदाम गोठविण्याची कारवाई केली आहे. या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही कोणतीही पूर्वकल्पना न देता लिलाव जाहीर करण्यात आला आहे. एका दिवसाच्या नोटीसीवर आता गोदामातील मालाचा लिलाव करण्यात येणार असल्याने नाशिकमधील व्यापाऱ्यांनी महामंडळाच्या अंबडमधील गोदामासमोर आंदोलन केले.
गोदाम व्यवस्थापकांना व्यापाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिल्यावरही त्यांची कोणतीही बाजू समजून न घेता व्यवस्थापकाने त्यांना तेथून हाकलून लावले. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी यासंदर्भात कायदेशीर नोटीस दाखल करण्याचा निर्णय घेतला. गोदामातील मालाचा लिलाव झाल्यास सुमारे २१ व्यापाऱ्यांचे जवळपास तीन कोटींचे नुकसान होणार आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तसेच निमा, आयमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली असून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आम्ही मोठ्या विश्वासाने किराणा तसेच इतर माल साठवणुकीसाठी ठेवला होता. परंतु, संबंधित ठेकेदाराने म्हणजेच आरजेव्हीएम प्रॉडक्ट कंपनीचे वैभव अग्रवाल, राज कुमार, जतीन गुप्ता (रा.गाजियाबाद ) यांनी महामंडळाचे भाडे थकवल्यामुळे महामंडळाने गोदामातील माल गोठविला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एका दिवसाच्या नोटीसीवर या मालाचा लिलाव देखील जाहीर केला आहे. वास्तविक असे करणे बेकायदेशीर असून न्यायालयात गेल्यावर त्याला स्थगिती मिळाली आहे. परंतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्याचा लिलाव होणार असल्याने २० व्यापाऱ्यांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने योग्य मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा, असे निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय वखार महामंडळाचे कार्य
केंद्रीय वखार महामंडळ हा भारत सरकारचा उपक्रम असून देशभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्योगिक, कृषी क्षेत्र, अन्नधान्याची .नासाडी होउ नये म्हणून, साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मिती केली आहे. औद्योगिक वस्तू, किराणामाल, कृषी गोदामांमध्ये धान्य साठवणूक तसेच या मालाचे संरक्षण करणाऱ्या प्रशिक्षित व अनुभवी मनुष्यबळाद्वारे पेस्ट कंट्रोलच्या सेवा सुद्धा पुरविण्यात येतात.महामंडळाचा उद्देश गोदामांमध्ये शेतमालाची सुरक्षितपणे व आधुनिक शास्त्रीय पद्धती वापरून साठवण करणे, त्या मालाला ओलावा, दमटपणा, कीड इत्यादींपासून धोका पोहोचणार नाही. मालाचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारची काळजी घेणे. गोदाम पुरवठा साखळीत कार्यरत विविध प्रकारच्या संस्थामध्ये केंद्रीय वखार महामंडळ (सेंट्रल वेअर हाउसिंग कॉर्पोरेशन) या केंद्रीय स्तरावरील संस्थेची गोदाम पुरवठा साखळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.