लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित मंत्र्यांचा ताफा, लाभार्थ्यांसह नेत्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधामुळे कार्यक्रम स्थळाच्या बाजूला असलेल्या पर्यायी मार्गांवर नाशिककरांना वाहतूक कोंडीस तोंड द्यावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांसह इतर मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आलेल्या मंत्र्यांचे ताफे, शासकीय वाहने तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी ने-आण करणारी वाहने, यांच्यामुळे वाहनांच्या गर्दीत भर पडली. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे मुख्य रस्ते इतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे या वाहतुकीचा ताण अन्य पर्यायी मार्गावर आला.

हेही वाचा… “सगळे अजित पवार रेटून नेतात असं सांगतात”, देवेंद्र फडणवीसांसमोर एकनाथ शिंदे म्हणाले…

कॉलेज रोड, मॅरेथॉन चौक परिसरात गंगापूर रोड, शरणपूर रोडवर वाहतूक विस्कळीत झाली. कार्यक्रमाचे ठिकाण गाठण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागली, वाहने लावण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने चालकांना अडचणी आल्या. पायी चालणाऱ्यांनाही वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस गर्दीत अडकल्याने कोंडी अधिकच वाढली. प्रत्येक ठिकाणी ही कोंडी फुटण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागला. कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने अनेक चालक पोलीसांशी वाद घालताना दिसले. काहींनी पर्यायी मार्ग स्विकारला.

शाळा, महाविद्यालयांना सक्तीची सुट्टी

शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर परिसरातील शाळा, महाविद्यालयांना सक्तीची सुट्टी देणे भाग पडले. शहरातील जी शाळा, महाविद्यालये सुरू होती, त्यातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना वाहतूक कोंडीमुळे अडचणींना तोंड द्यावे लागले.

कार्यक्रमात जिल्हाभरातून हजारो लाभार्थी सहभागी झाले. त्यांच्यासाठी ५०० हून अधिक बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सहभागी होणार असल्याने कार्यक्रम स्थळासभोवतालच्या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली होती. वाहतुकीवर निर्बंध असल्याने अशोक स्तंभ ते जुना गंगापूर नाका परिसरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली.

हेही वाचा… यावलमध्ये महसूल पथक सक्रिय; अवैध वाळूचे डंपर जप्त

डोंगरे वसतिगृहालगत व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या प्रांगणाचा विशेष मान्यवरांची वाहने उभी करण्यासाठी वापर झाला. या दिवशी गंगापूर रस्त्यावरील मविप्र शिक्षण संस्थेचे अभिनव बाल विकास मंदिर. मराठा हायस्कूल, केटीएचएम महाविद्यालय, आयएमआरटी व समाजकार्य महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली. वाघ गुरूजी व शहरातील अन्य काही शाळा नियमितपणे सुरू होत्या. पण त्यातील विद्यार्थी व शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना कोंडीचा फटका बसला. अनेकांना वाहतूक निर्बंधाची कल्पना नव्हती. कार्यक्रम स्थळाभोवतालचे रस्ते बंद होते. त्यामुळे शालेय बस, वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. ही वाहने ठिकठिकाणी कोंडीत अडकली. मार्गक्रमण करणे अवघड झाले.