नाशिक: जिल्हा परिषदेकडून तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्या असून, या प्रक्रियेत समूपदेशनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नव्या जागी पदस्थापना देण्यात आली. पेसा आणि नॉन पेसा विभागातील कर्मचाऱ्यांच्या समतोल बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेतील एकूण १० विभागातील ७४० कर्मचा-यांच्या प्रशासकीय विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी शाळेत ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हे उपस्थित होते. या बदल्यांमध्ये प्रशासकीय बदल्या १५ टक्के आणि विनंती बदल्या पाच टक्के इतक्या प्रमाणात करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेने पेसा (आदिवासी) क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नॉनपेसा विभागात बदली करून तसेच नॉन पेसा विभागातील कर्मचाऱ्यांना पेसा क्षेत्रात बदली देत प्रशासकीय समतोल साधण्याचा प्रयोग केला. यामुळे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी पदस्थापना मिळाली असून नॉन पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना पेसा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.