त्र्यंबकेश्वरमध्ये मुक्त विद्यापीठाचा प्रयोग; दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांसाठी आशादायक चित्र
त्र्यंबकेश्वरच्या ज्या भागात पारंपरिक पीक सोडून दुसरे कोणतेही पीक घेतले जात नव्हते, अशा चाकोरे या आदिवासी गावात शेतकऱ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आंतरपीक पद्धतीत बटाटा पिकाचे विक्रमी उत्पादन घेत अभिनव प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या जिल्ह्यात यशस्वी झालेला हा प्रयोग इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यात पावसाचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे इतर गावांप्रमाणे चाकोरे परिसरातील ग्रामस्थ वर्षांनुवष्रे भात, वरई आणि नागली याची शेती करायचे. खरीप हंगाम झाल्यावर कामाच्या शोधार्थ त्यांचे स्थलांतर ठरलेले. स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मुक्त विद्यापीठाने हे गाव दत्तक घेतले. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतातील मातीचे सर्वेक्षण केले आणि बटाटा पीक घेण्याचे निश्चित स्थानिकांशी सकारात्मक चर्चा केली. आद्यरेषा प्रात्यक्षिकांतर्गत उसात बटाटा आंतर पिकाचा प्रयोग करण्यात आला. त्यात एकरी ७० क्विंटल बटाटय़ाच्या कुफरी पुखराज वाणाचे उत्पादन घेण्यात आले. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बटाटय़ाची लागवड करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात बटाटय़ाच्या दोन ओळीत उसाची लागवड करण्यात आली.
एक एकर लागवडीसाठी बटाटय़ाचे ५०० किलो बेणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत पुरविण्यात आले. ८७ दिवसानंतर काढणी करण्यात आली. लाकडी नांगराच्या साहाय्याने बटाटय़ाची काढणी करताना उसाला अत्यावश्यक असणारी आंतर मशागत आपसूक झाली. बटाटय़ाचा पालापाचोळा उसाला सेंद्रिय खत पुरविण्यास पूरक ठरला. महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून पाण्याची बचत झाली. उसाला देण्यात येणाऱ्या पाण्यात बटाटय़ाचे पीक तयार झाले. ऊस उत्पादनाचा खर्च बटाटय़ाने भागविल्याने उसापासून मिळणारे उत्पन्न हे बोनस ठरले. ऊसा व्यतिरिक्त अडीच महिन्यात बटाटय़ाचे ७० क्विंटल उत्पादन मिळाले. बटाटय़ाचा सरासरी दर १० रुपये किलो धरल्यास ७० हजार रुपयांचे उत्पन्न एका एकरमधून मिळाले. परस्परपूरक पीक पद्धतीचा प्रयोग तालुक्यात प्रथमच झाला. विमल आचारी यांच्या शेतावर तो करण्यात आला. त्याने इतर शेतकरी प्रभावीत झाले असून या पद्धतीचा वापर करण्यास त्यांनी संमती दिली आहे. या प्रयोगासाठी कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ प्रा. हेमराज राजपूत यांनी पुढाकार घेतला.
विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चाकोरे या आदिवासी गावात हंगामी पिकांसोबत फळ पिके, भाजीपाला, कृषीपूरक उद्योग, महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी छोटी यंत्रे, प्रक्रिया उद्योग असे कार्यक्रम राबविले जात आहेत. याच प्रकल्पांतर्गत काही पर्यायी व अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांचा समावेश शास्त्रीय पद्धतीने करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा प्रयत्न आहे.
– डॉ. माणिकराव साळुंखे कुलगुरू