त्र्यंबकला येऊन माऊलीच्या दर्शनाने कृतार्थ झालो..दर्शन झाले अन् दमछाकही. पुन्हा नाही येणार..दर्शन व स्नानाचा आनंद घेतला पण परतीच्या प्रवासात झालेली पायपीट दमवणारी ठरली..आमचे पैसे गेले सांगा, काय करू..
अशा संमिश्र भावनांच्या कल्लोळात त्र्यंबक येथील तीसरी शाही पर्वणी भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडली. काही भाविकांच्या नशिबी ‘कृतार्थ’ पर्वणी आली तर काही जणांच्या नशिबी तशी पर्वणी आली नाही. त्यामुळे त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. त्र्यंबकच्या तीसऱ्या पर्वणीसाठी मध्य प्रदेशातून आलेले जुगुल त्रिपाठी यांनी आपण पहिल्यांदा कुंभमेळ्याला आल्याचे सांगितले. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलो, पण शाही स्नानाचे पुण्य लाभले. ‘ये सब गंगा मैया की कृपा’ असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद येथील गोरखनाथ हाके यांनी स्नानानंतर निवृत्तीनाथांच्या चरणी मस्तक ठेऊन कृतार्थ झाल्याचे सांगितले. वारीत नेहमी सहभागी होतो. परंतु, यंदा पर्वणीत सहकुटुंब सहभागी झाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बिहार येथील एका विद्यालयात इयत्ता तीसरीत शिकणाऱ्या करिना कुमारची गर्दीत वडिलांपासून ताटातूट झाली. या गर्दीत आपल्या आई-बाबांना शोधण्यासाठी एका महिलेचा आधार घेत तीने पोलीस ठाणे गाठले. आई-बाबा म्हणाले तुला गंमत दाखवतो म्हणून येथे आले, तर आई-बाबाच गायब झाल्याचे म्हणत ती हमसाहमशी रडत होती.
राजस्थान येथील हेम देवी यांनी तीन दिवसापासून त्र्यंबकमध्ये असून सकाळ-सायंकाळ त्र्यंबकराजाचे दर्शन आणि कुशावर्तावर स्नान केल्याचे सांगितले. पर्वणीच्या गर्दीत अडकलो आणि पंधरा हजार रुपये मारले गेले. आता घरी कसे परतायचे, असा प्रश्न असून अजून भक्तिनिवासचे पैसेही देणे बाकी असल्याची वेगळीच व्यथा त्यांनी मांडली.
नगर येथील मीराबाई काळे व शारदा पवार यांनी कुंभमेळा काय असतो हे अनुभवण्यासाठी नाशिकचा रस्ता धरला. परंतु, नाशिक बस स्थानकापासूनच आबाळ सुरू झाल्याचे त्यांनी मांडले. बस मिळाली पण मध्येच खंबाळा येथे एक तासाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली. त्र्यंबक डोळ्यासमोर असल्याने तेथुनच चालायला सुरूवात केली आणि कुशावर्त गाठले. स्नानानंतर त्र्यंबक दर्शनासाठी झालेली गर्दी, त्यातील धक्काबुक्की, पोलिसांचे अपशब्द, यामुळे पुन्हा येथे येण्याचे नाव नाही काढणार, असा नाराजीचा सूर त्यांनी व्यक्त केला. नीलेश देशपांडे यांनी परतीच्या प्रवासासाठी त्र्यंबक बस स्थानकावर प्रचंड गर्दी, बसेसचा तुटवडा यामुळे अर्धा पाऊण तास वाट पाहून चालण्यास सुरूवात केली. सात किलोमीटर चालत आल्यानंतर बस मिळाली. मात्र त्या आधीच्या सर्व बसेस गर्दीने तुडूंब तर होत्या, परंतु बसच्या टपावरही २०-२५ प्रवासी दाटीवाटीने बसले होते, असे सांगितले.
उदयपूरहून हितेश चोकसी हे राजस्थानच्या ६०० भाविकांसमवेत खासगी आराम बसने आले आहेत. सकाळी आठ वाजता त्र्यंबकमध्ये दाखल होऊनही दुपारी तीनपर्यंत दर्शन नाही की स्नान नाही. दिशादर्शक फलकांवरून काही लक्षात येत नाही. पोलीस योग्य माहिती देत नाहीत. त्र्यंबकच्या तुलनेत उज्जन, अलाहाबाद, हरिद्वारला कुंभमेळा अधिक चांगला होतो. त्र्यंबकची प्रचंड गर्दी आणि व्यवस्था पाहून आम्ही सर्व भाविक नवीन घाटावर स्नान करून निघून जाऊ, असे त्यांनी नमूद केले. मंडी येथील प्रेमकुमार विश्वकर्मा यांनी आम्हा कुटुंबियांना सात ते आठ किलोमीटर पायपीट करत यावे लागल्याचे नमूद केले गेले. हे कमी म्हणून की काय, येथे गर्दीत रोखून धरण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.