नाशिक – शहरातील अपंग बालक, व्यक्ती यामध्ये मतीमंद, गतीमंद असलेल्यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्यासाठी फरफट होत आहे. महापालिकेच्या वतीने संबंधित विभागाकडून जे प्रमाणपत्र दिले जाते, त्यातील काही पदे रिक्त असल्याने संबंधितांना जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने अपंग बालक, व्यक्तींची कोणत्या प्रकारचे व्यंग आहे, ते किती प्रमाणात आहे, या अनुषंगाने काही तपासण्या करण्यात येतात. शारीरिक व्यंग शोधण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासण्यानंतर संबंधिताची शारीरिक क्षमता लक्षात घेता त्यानुसार प्रमाणपत्र दिले जाते. जिल्हा रुग्णालयात या अनुषंगाने आवश्यक सोयी सुविधा तसेच डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील अपंग व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी जातात. याचा ताण जिल्हा शासकीय रुग्णालयावर येत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी तोंडी आदेश देत या ठिकाणी केवळ ग्रामीण भागातील संबंधित रुग्णांची तपासणी होईल.
शहर परिसरातील रुग्णांची महापालिकेच्या बिटको रुग्णालय तसेच डाॅ. जाकीर हुसेन रुग्णालय येथे तपासणी करण्यात यावी, अशी सूचना केली. यामुळे शहरातील रुग्णांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय सहकार्य करत नाही. आणि महापालिका रुग्णालयात याविषयी व्यवस्था नाही. अशा कोंडीत अपंग व्यक्ती सापडल्या आहेत. यामुळे अपंगांना वेगवेगळ्या शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे, शिवाय प्रमाणपत्र मिळवतांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याविषयी एका अपंग व्यक्तीच्या भावाने व्यथा मांडली. त्यांचा भाऊ मतिमंद आहे. त्याची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपासून बिटको रुग्णालय तसेच जाकिर हुसेन रुग्णालयात ते चकरा मारत आहेत. परंतु, महापालिका रुग्णालयांमध्ये फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ नाहीत. यामुळे पुढच्या आठवड्यात या, असे सांगितले जात आहे. मतिमंद भावाचा स्वभाव लहरी असल्याने अशा स्थितीत रुग्णालयात वारंवार फेऱ्या मारणे जड जात आहे. यावर लवकर पर्याय निघावा, अशी मागणी त्यांच्यासह संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.
याविषयी महापालिका उपायुक्त करिष्मा नायर यांनी भूमिका मांडली. महापालिकेच्या डाॅ. जाकीर हुसेन तसेच बिटको रुग्णालयात प्रमाणपत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही पदे रिक्त आहेत. याबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने लवकरच या ठिकाणी तपासण्या करण्यात येतील. पंधरा ते वीस दिवसात हे काम सुरू होईल, असा विश्वास नायर यांनी व्यक्त केला.