जळगाव : जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे  निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली असता, नगराध्यक्षपदाचे ६८ आणि नगरसेवकपदाचे ९०० पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरले. दरम्यान, रावेर तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे अर्ज तीन अपत्य असल्याच्या कारणावरून अवैध ठरविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रमुख आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीच्या (शरद पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस) नेत्यांनी युतीधर्म पाळण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, निवडणुकीच्या रणांगणात त्यांचे प्रयत्न अनेक ठिकाणी निष्फळ ठरले. महायुतीत काही मोजक्या ठिकाणी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची तिन्ही पक्षांची सांगड बसली आहे.

उलट काही भागात अजित पवार गट आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटासोबत हातमिळवणी केल्याचे चित्र दिसून आले आहे. या अनपेक्षित आघाड्या आणि अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी सरळ लढतीऐवजी चौरंगी स्पर्धेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

जिल्ह्यातील १८ ठिकाणी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यात भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा या नगर परिषदांसोबत शेंदुर्णी व मुक्ताईनगर नगर पंचायतींचा समावेश आहे.

मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडणुका अधिकच  चुरशीच्या होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. मंगळवारी मुदत संपल्यानंतर विविध ठिकाणी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीदरम्यान नगराध्यक्षपदाचे ६८ आणि नगरसेवकपदाचे ९४५ पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरले. छाननी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी १७४ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी २८९७ अर्ज वैध ठरले.

दरम्यान, सावदा (ता. रावेर) येथे नामनिर्देशनपत्रांच्या छाननी प्रक्रियेत तीन अपत्य कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ (एक)(क) अन्वये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. प्रभाग क्रमांक १० (ब) मध्ये शेख अल्लाबक्ष शेख नजीर यांच्या अर्जाला शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवारांनी हरकत घेतली होती.

तक्रारीची शहानिशा केल्यावर उमेदवाराला १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य (जन्म १२ एप्रिल २०२०) असल्याचे सिद्ध झाले. शेख यांनी प्रतिज्ञापत्रात केवळ दोनच अपत्यांचा उल्लेख केला होता. मात्र, सावदा तसेच रावेर नगर परिषदाच्या जन्म नोंद वह्या तपासल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. याशिवाय, प्रभाग क्रमांक दोन (ब) मधील अजित गटाच्याउमेदवार आसमाबी शेख अल्लाबक्ष यांचेही नामनिर्देशनपत्र तीन अपत्य असल्याने अवैध ठरले. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तिन्ही अपत्यांचे जन्म दाखले सादर करण्यात आले होते.

सावदा येथील जन्मनोंदीवरून तिसऱ्या अपत्याचा जन्म १२ एप्रिल २०२० रोजी झाल्याचे सिद्ध झाले. अर्ज अवैध ठरलेल्या प्रभाग १० (ब) मधील उमेदवाराच्या त्या पत्नी असल्याने दोघांनाही कायद्यानुसार अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाविरुद्ध संबंधितांना नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करता येणार आहे.