लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे गावी जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एप्रिल ते जून या कालावधीत जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाश्यांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक बस, शिवनेरी, शिवाई यांसह इतर साध्या बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्यावर गावी जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे बससेवा अपुरी पडते. उन्हाळी सुट्यांमध्ये तर हे चित्र अधिकच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र दिसून येते. गावी जाणाऱ्या गर्दीचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

आणखी वाचा-“इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात कामगारांविषयक मागण्यांचा समावेश करा”, संयुक्त कृती समितीची मागणी

नाशिक विभागाच्या वेगवेगळ्या आगारातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी बससेवा सुरू आहे. नाशिक (एक) आगारातून चोपडा, धुळे, नाशिक (दोन) आगारातून नंदुरबार, जळगाव, मालेगाव आगारातून छत्रपती संभाजीनगर, सटाणा आगारातून नाशिक, नंदुरबार, सिन्नर आगारातून नाशिक, अहमदनगर, शिर्डी, नांदगाव आगारातून पाचोरा, छत्रपती संभाजीनगर, इगतपुरी आगारातून धुळे, चोपडा, लासलगांव आगारातून नाशिक, पेठ येथून अहमदनगर, शिर्डी, येवला येथून छत्रपती संभाजीनगर, पिंपळगांव नंदुरबार, शिरपूर, पाचोरा, धुळे येथे जाण्यासाठी जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त एक एप्रिलपासून नाशिकहून सप्तश्रृंगी गड मार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच नाशिक-पुणे, नाशिक-धुळे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, सटाणा मार्गावर दर अर्ध्या तासाने बसफेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात जुने सीबीएस, नवीन सीबीएस, मुंबईनाका आणि मेळा या स्थानकांतून वेगवेगळी शहरे, गावांसाठी बससेवा सुरु आहे. त्यामुळे गर्दीची काही प्रमाणात विभागणी झाली आहे. प्रवाश्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.