नाशिक – मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे जिल्ह्यात दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला. हजारो हेक्टरवरील कांदा, आंब्याचे नुकसान झाले. सोमवारी बागलाण तालुक्यात अवकाळीसह गारपीटही झाली. वादळामुळे शहरात चार ते पाच दिवसांत १५० पेक्षा अधिक झाडांची पडझड झाली आहे. या पडझडीमुळे सातपूर औद्योगिक वसाहतीत १२ ते २० तास वीज पुरवठा बंद राहिल्याने उद्योगांचे सुमारे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपीट, वादळी पाऊस हजेरी लावत आहे. दोन दिवसांत पावसाची तीव्रता अधिक वाढली. सुरगाण्यातील खडकीदिगर येथे देविदास भोये यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर अंगावर वीज पडून इगतपुरीतील मौजे उंबरकोने येथील पूजा भांगरे (२३) यांचा मृत्यू झाला. अनेक भागात घरांचे पत्रे उडाले. पाच ते आठ मे या कालावधीत साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा (९५७ हेक्टर), आंबा (१८५२), डाळिंब (१४१ हेक्टर) आदींचा समावेश आहे. शहरात चार ते पाच दिवसांत १५० पेक्षा अधिक झाडांची पडझड झाली. सोमवारी दुपाऱी पुन्हा पाऊस झाला. खंडित वीज पुरवठ्यामुळे उद्योगांचे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) उपाध्यक्ष मनिष रावत यांनी व्यक्त केला.