जळगाव – मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष व शिवमहाकथा पुराण महोत्सवासाठी गेलेल्या खानदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर पाच गंभीर जखमी झाले. ही घटना मध्य प्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ शुक्रवारी पहाटे घडली.

मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष व शिवमहापुराण महोत्सवात गुरुवारी पहिल्या दिवशी रुद्राक्ष घेण्यासाठी सुमारे वीस लाख भाविकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. तेथेच अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील महिला गेल्या होत्या. पातोंडा येथून सोमवारी अनेक भाविक सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाम येथे रवाना झाले होते. मध्यरात्री बारानंतर सिहोर येथील कुबेरेश्‍वर धाम येथून परत येताना मध्य प्रदेशातील इंदूर महगामार्गावरील जुलवानिया गावानजीक जयस्वाल ढाब्याजवळ वाहनाला अपघात झाला. त्यात कमलबाई पाटील (वय ५५, रा. पातोंडा, ता. अमळनेर) व शोभाबाई पाटील (वय ५२, रा. पातोंडा, ता. अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनचालक नितीन पारधी याच्यासह निर्मलाबाई पाटील (वय ५६), राजकुवर पाटील (वय ६७), मंगलबाई पाटील (वय ६०), कमलबाई पारधी (वय ६२) यांना जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती राजेंद्र वाणी यांनी जुलवानिया येथील पोलीस ठाण्यात दिल्यानंतर मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने जखमींना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच मृत शोभाबाई पाटील व कमलबाई पाटील यांचे जुलवानिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. जुलवानिया व ओझर येथील मोहनलाल मिस्तरी, अजय मिस्तरी, दीपक शर्मा, कमलेश जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक रेवाराम चौहान, हवालदार प्रशांत सोलंकी यांनी सहकार्य केले.

हेही वाचा – धुळे मनपा दवाखान्यांना कुलूप पाहून महापौर संतप्त; कारवाईचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – धुळे मनपात समाविष्ट गावांचा करवाढीला विरोध; उपोषणाचा इशारा

शोभाबाई व कमलबाई या एकाच कुटुंंबातील असून, कमलबाई पाटील या जेठाणी, तर शोभाबाई पाटील या त्यांच्या दिराणी आहेत. शोभाबाई पाटील यांच्यामागे पती, मुलगा, सून, नातवंडे व दोन मुली, तर कमलबाई पाटील यांच्यामागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे व मुलगी असा परिवार आहे.