मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख रामा मिस्तरी यांनी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मालेगावात धक्का बसला आहे. अविभाजित शिवसेनेत मिस्तरी यांनी अनेक वर्षे मालेगाव महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले.

हेही वाचा >>> Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?

अलीकडेच, ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांचेकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन मिस्तरी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आपले पद काढून घेण्यात आले असून त्यास हिरे हे जबाबदार असल्याचा आरोप मिस्तरी यांनी केला. काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले बंडू बच्छाव यांना गेल्या महिन्यात आपण संजय राऊत यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर बच्छाव सक्रिय झाल्याने मालेगाव बाह्य मतदार संघात उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार झाले. त्याचा हिरे यांना राग आला असावा आणि त्यातून त्यांनी आपल्याला पदावरुन काढण्यासाठी षडयंत्र रचले, असेही मिस्तरी यांनी म्हटले आहे. मिस्तरी हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.