नाशिक – जपानसारख्या देशात भारताची निर्यात अतिशय कमी आहे. ज्या ठिकाणी कमी निर्यात होते वा, होतच नाही, अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करावे. संकट ही संधी असते. त्याचा लाभ घेण्यासाठी स्पर्धात्मकता वाढविण्याची गरज राज्य सरकारच्या कृती दलाचे अध्यक्ष आणि संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार अपूर्व चंद्रा यांनी येथे मांडली.
अमेरिकेने वाढविलेल्या शुल्काचा राज्यातील वाहन, दागिने, अन्न प्रक्रिया, मत्स्य आणि सागरी उत्पादने आदी क्षेत्रांवर काय परिणाम होईल, त्यासाठी करावयाच्या उपाय योजना, यासाठी राज्य सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाकडून विभागीय स्तरावर संबंधित उद्योजक, निर्यातदार संघटनांशी संवाद साधला जात आहे. त्या अंतर्गत कृती दलाचे अध्यक्ष चंद्रा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
यावेळी औषध. कृषी, वाहन, अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रनिहाय उद्योगांची त्यांनी माहिती घेतली. नाशिक इंडस्ट्रियल ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) उपाध्यक्ष मनिष रावत यांनी वाहन उद्योगातील पुरवठादार आणि लघु उद्योजकांसमोरील समस्या मांडल्या. वाहनाचे सुटे भाग आणि तत्सम अभियांत्रिकी सामग्रीबाबत एक वर्षाचे करारनामे झालेले आहेत. त्यामुळे अनेकांनी कच्चा माल घेतलेला होता.
या संकटामुळे संबंधित उद्योजक, पुरवठादार पूर्णत: अडकले असून ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना या संकटातून सावरण्यासाठी कर, व्याजदरात सवलत द्यावी लागेल. अन्य देशात निर्यात वाढविण्यासाठी शासनाने विपणन आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थानिक उद्योजकांचा सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज रावत यांनी मांडली.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी स्थानिक पातळीवरील एचएएल, डीआरडीओ प्रयोगशाळा यांचे दाखले देत नाशिकमध्ये लष्करी सामग्री उत्पादन क्षेत्राला बळ देण्याची संधी असल्याचे नमूद केले. कृषिमाल परदेशात पाठविण्यासाठी मुंबईपर्यंत न्यावा लागतो. नाशिकच्या विमानतळावर कार्गोची व्यवस्था झाल्यास वाहतूक खर्चात बचत होईल. अमेरिका वगळता अन्य देशात निर्यात वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी काही संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. संबंधितांची अपेक्षा व सूचना सरकारसमोर मांडण्याचे आश्वासन चंद्रा यांनी दिले. अनेक देशात आपली उपस्थिती नाही. जपानसारख्या काही देशात निर्यातीचे प्रमाण कमी आहे. अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात वाढविण्याकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तरलता वाढविण्याचा विचार
राज्य शासन आणि अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्यावतीने गेल्या महिन्यात येथे आयोजित आयमा इंडेक्स २०२५ या गुंतवणूक महाकुंभ कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची माहिती दिली होती. निर्यात वाढविण्यासाठी शासनाने कृती दलाची स्थापन केली. तरलता वाढविण्याचा विचार होत असल्याची माहिती डॉ. अन्बलगन यांनी दिली होती.