नाशिक : रोखठोक, परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात भ्रमणध्वनीवर कथित रमी खेळण्याच्या चित्रफितीमुळे विरोधकांसह शेतकरी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांना अभय दिल्याचे समोर आले. कथित रमी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी असल्यास नागपूर अधिवेशनात आपण राजीनामा देऊ असे कोकाटेंनी सूचित केल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्याबाबत टोकाचा निर्णय घेणे टाळल्याचे मानले जाते.
कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी कोकाटे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कृषिखात्याची जबाबदारी मिळताच एका कार्यक्रमात त्यांनी हे खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे म्हटले होते. नंतर पीक विमा योजनेच्या विधानावरून वाद उद्भवला. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. सरकारने एक रुपयात पीक विमा दिला. त्याचा गैरफायदा लोकांनी घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना कर्जमाफी, पीक विम्याच्या पैशातून घरातील साखरपुडे, लग्न उरकली जातात, असे त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून म्हटले होते. मान्सूनपूर्व पावसात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेव्हा शेतात जे कांदे आहेत, त्याचे पंचनामे होतील, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा प्रश्न कोकाटे यांनी केला होता.
वादग्रस्त विधानांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना तंबी देखील दिली. तेव्हापासून काहिसे सावध पवित्रा घेणारे कोकाटे हे कथित रमीत अडकले. त्यांच्या नित्यनव्या कृत्याने पक्षासह उपमुख्यमंत्री पवार हेही अडचणीत आल्याची चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी प्रगट केली होती. यामुळे कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल असे मानले जात होते. तथापि, कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी करत आरोप करणाऱ्या विरोधकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
कथित रमी प्रकरणावरून राज्यात वादळ उठले असताना कोकाटे यांनी आपण आयुष्यात कधी एक रुपयाची ऑनलाईन रमी खेळलेलो नाही, हा खेळ आपल्याला खेळताच येत नसल्याचा दावा केला. राजीनामा देण्यासाऱखे काही घडलेले नाही. मी काही विनयभंग केला का, माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, असे प्रश्न केले. कथित रमी प्रकरणाची सखोल चौकशी करावी. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे. आपण दोषी असल्यास थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करू असे कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. कथीत रमी प्रकरणावरून वादं कुणी निर्माण केले, ज्यांनी आरोप केले, त्यांच्या भ्रमणध्वनीची सीडीआर तपासणी करा, कुठलेही पुरावे नसताना आपणास का लक्ष्य केले जाते असा प्रश्न करत चौकशीतून सर्व बाहेर येईल असे त्यांनी सूचित केले. विरोधकांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.