भालचंद्र कांगो यांची घोषणा

आर्थिक मंदीचा जाब विचारण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यात १५ जागा लढविणार आहे. आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा पक्षाचे केंद्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत केली.

विधानसभेसाठी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्षांची आघाडी असून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाकपने १५ जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये गडचिरोली, वाशिम, औरंगाबाद, धुळे, मुंबई, कोल्हापूर, पारनेर आणि नाशिक जिल्ह्य़ातील जागांचा समावेश आहे. चांदवड आणि नांदगावची जागा आघाडीकडे मागितल्या आहेत. चांदवडमधून अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, नांदगावमध्ये देवीदास भोपळे, विजय दराडे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे कांगो यांनी सांगितले.

आघाडीसोबत बुधवारी मुंबई येथे चर्चा होणार आहे. जागेच्या बाबतीत एक पाऊल मागे येऊ, परंतु समाधानकारक सहकार्य न मिळाल्यास राज्यात १५ ठिकाणी स्वतंत्रपणे भाकप निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. त्यावेळी आघाडीला सहकार्य राहील तसेच वंचित बहुजन आघाडीला काही ठिकाणांवर पाठिंबा दिला जाईल. अन्य ठिकाणांहून राज्य कार्यकारिणीकडे प्रस्ताव आले असून कार्यकारिणी कोणाला उमेदवारी द्यावी हे ठरवेल, असेही कांगो यांनी नमूद केले.

देशात आर्थिक मंदीचा महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक फटका बसला असून राज्यातील ७० टक्के उद्योग बंद पडले आहेत. शहरीकरण बेफाम होत आहे. काही ठिकाणी दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. या सर्व प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविला जाईल. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पक्षाचे योगदान, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाचे प्रश्न जनतेसमोर आणण्यात येतील, असेही कांगो म्हणाले. यावेळी राज्य सचिव मंडळ सदस्य राजू देसले, भास्कर शिंदे, महादेव खुडे, सुखदेव केदारे आदी उपस्थित होते.