भाजपचे शिवसेना नगरसेवकांना आव्हान
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवार विलास शिंदेंना पाठबळ देण्यासाठी ३६ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची खेळी केली असली तरी हे राजीनामे संबंधितांनी महापालिका आयुक्तांकडे देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपने दिले आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठबळ देण्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे ३६ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे संपर्कप्रमुखांकडे दिले. या घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा राजीनाम्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. आपल्या नेत्यांकडे दिलेले राजीनामे नंतर मागे घेता येतात. सेना नगरसेवकांना खरोखर राजीनामे द्यायचे असल्यास त्यांनी ते पालिका आयुक्तांकडे द्यावेत, असे भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. शिवसेनेचे राजीनामा नाटय़ संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पाच वर्षे जनतेने ते अनुभवले आहे. सेनेच्या बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही. मागील निवडणुकीत सेना आणि भाजपचे उमेदवार स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा सेनेच्या अधिकृत उमेदवारास भाजपने पराभूत केले. यावेळी त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावाही पालवे यांनी केला.
शिवसेनेने युती धर्माचे पालन केले नाही. सेना नगरसेवकांनी राजीनाम्याचे जे नाटय़ रंगवले, त्याची जनतेला जाणीव आहे. जनताच सेनेला धडा शिकवेल, या गृहीतकापर्यंत भाजपचे पदाधिकारी आले आहेत. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. नाशिक पश्चिममध्ये भाजपचे एकूण २३ नगरसेवक आहेत. शिवसेनेकडे दुर्लक्ष करत सर्वाना अधिक जोमात प्रचाराला लागण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.