मतमोजणीची तयारी पूर्णत्वास
जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १५ मतदारसंघांतील मतपेटीत बंद झालेल्या १४८ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल गुरुवारी लागणार आहे. बंडखोरी, पक्षांतरामुळे गाजलेल्या निवडणुकीत सेना-भाजप महायुतीला यश येते, की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी त्यावर ताबा मिळवते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर १० वाजल्यापासून कल समजण्यास सुरुवात होईल. दुपारी एक वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येतील. म्हणजे अवघ्या चार ते पाच तासांत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्ह्य़ात ६२.०१ टक्के मतदान झाले. शहरी भागात कमी, तर ग्रामीण भागात जास्त मतदान झाले. या सर्वाचा लाभ कोणाच्या पदरात पडणार, याची समीकरणे राजकीय वर्तुळात बांधली जात आहेत. त्याची पडताळणी प्रत्यक्ष मतमोजणीतून होणार आहे. अनेक मतदारसंघांत दुरंगी, तिरंगी लढती होत असून त्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. मतदानाची संपूर्ण तयारी निवडणूक यंत्रणेने केली आहे. मतमोजणीनंतर मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. काही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी जॅमर बसविण्याची मागणी केली होती. परंतु ती फेटाळण्यात आली आहे.
उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व्यवस्थेची पाहणी करू शकतात. तिथे वास्तव्य करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतमोजणीसाठी सुमारे दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी सुरक्षा कक्ष सकाळी साडेसात वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत उघडला जाईल. प्रारंभी टपाली आणि ईटीपीबीएस मतपत्रिकांची मतमोजणी होईल. त्यानंतर अध्र्या तासाने प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतांची मोजणी टेबलांवर सुरू होईल. १० वाजेपर्यंत कल समजतील. अंतिम निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे यांनी सांगितले.
नाशिकमध्ये पाच मतदारसंघांची मतमोजणी
नाशिक शहरात पाच मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक पूर्वची मतमोजणी नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, नाशिक मध्य भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पश्चिमची अश्विननगर येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअम, देवळाली मतदारसंघाची नाशिक रोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय, इगतपुरी मतदारसंघाची सीबीएसलगतचे शिवाजी स्टेडिअम यांचा समावेश आहे. नांदगाव मतदारसंघाची नांदगाव तहसील कार्यालयाची नवीन इमारत, मालेगाव मध्य शिवाजी जिमखाना, मालेगाव बाह्य़ची कॅम्प रस्त्यावरील वखार महामंडळाचे गोदाम, बागलाणची सटाण्यातील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवणची पंचायत समिती सभागृह, चांदवडची नवीन प्रशासकीय इमारत, येवल्याची बाभूळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर मतदारसंघाचे तहसील कार्यालय, निफाडचे कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालय, दिंडोरीचे मविप्र शिक्षण संस्थेचे महाविद्यालय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.