राजकीय वातावरण ढवळून निघणार
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात जाहीर सभा, प्रचार फेऱ्या आणि ‘रोड शो’चा धडाका पाहायला मिळणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने भाजपने याची सुरुवात केली. येत्या काही दिवसात भाजपचे अन्य नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आदी नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप काही दिवसांपूर्वी शहरात झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहरात ‘रोड शो’ करून प्रचाराचा नारळ फोडला होता. नंतर पंतप्रधान आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तपोवन परिसरात भव्य सभा झाली होती. बुधवारी सायंकाळी सटाणा आणि चांदवड येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंचवटीतील श्रद्धा लॉन्स येथे सभा होणार असून याच दिवशी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे इगतपुरीत सेना उमेदवाराच्या प्रचारार्थ येणार आहेत. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्रामीण भागातील दिंडोरी आणि येवला या दोन विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १६ ऑक्टोबरला पिंपळगाव आणि लासलगाव येथे जाहीर सभा होणार आहे. राजकीय पटलावर कांद्याचा विषय गाजत आहे. पवार यांच्या सभेसाठी कांदा उत्पादक भागाची निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील ठिकठिकाणी सभा घेत असून गुरुवारी जानोरी, कळवण, ताहाराबाद येथे भुजबळ यांच्या सभा होणार आहेत. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी, रोड शो आणि सभांचे नियोजनही करण्यात आले आहे. शुक्रवारी बागलाण, दिंडोरी, सिन्नर येथे डॉ. कोल्हे यांच्या सभा तर मनमाड येथे रोड शो होऊन रात्री येवल्यात जाहीर सभा, तसेच शनिवारी मालेगाव तालुक्यातील कळवाडी, मालेगाव येथेही त्यांच्या सभा होणार आहेत. दुपारी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि सायंकाळी देवळाली मतदारसंघात डॉ. कोल्हे यांचा रोड शो आणि फेरी होईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा दरवेळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होते. यावेळी राज यांची सभा १६ तारखेला गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होणार आहे. काँग्रेसच्या जाहीर सभांचा कार्यक्रम अद्याप प्राप्त झालेला नाही. स्थानिक नेते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय नेते गुलाब नबी आझाद यांच्या सभांसाठी प्रयत्नशील आहेत.
गर्दी जमविताना दमछाक होणार
जाहीर प्रचाराची मुदत १९ ऑक्टोबरला संपुष्टात येईल. प्रचाराला फारसा अवधी नसल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड करीत आहेत. अखेरच्या टप्प्यात दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभा हा त्याचाच एक भाग. प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने सर्वपक्षीय नेत्यांचे नाशिकवर लक्ष आहे. सर्व मतदारसंघात एकाच वेळी जाहीर सभा, प्रचार फेरी, रोड शोचा धुरळा उडणार असल्याने गर्दी जमविताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.