नाशिक – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या खैरेवाडी येथे होणारा शासन आपल्या दारी हा उपक्रम काही तांत्रिक अडचणींमुळे चिंचले गावात घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्यात खैरेवाडी येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले.मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तहसीलदार यांच्या आदेशाने खैरेवाडी येथे हा कार्यक्रम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. तसे निरोप देखील तलाठींमार्फत त्या वाडीच्या ग्रामस्थांना दिले गेल्याने मंगळवारी सर्व ग्रामस्थ घरीच थांबले. अधिकारी येतील म्हणून वाट पाहत बसले. परंतु, अधिकारी वाडीवर आलेच नाही. अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे खैरेवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. एकही नागरिक त्याठिकाणी गेला नाही.
मागील महिन्यात खैरेवाडी येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे दोन किलोमीटर पायपीट करीत गेले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुका प्रशासनाला आदेश दिले. वाडीतील ग्रामस्थांना शासकीय सुविधा मिळाव्यात, योजनेचा लाभ मिळावा म्हणून दाखले उपलब्ध करून देण्यासाठी खैरेवाडीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी निश्चित केले होते. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांनी खैरेवाडीऐवजी चिंचले गावात शिबीर घेतले. त्यामुळे खैरेवाडीच्या ग्रामस्थांना तिथे येणे अवघड झाले. एकही ग्रामस्थ त्या कार्यक्रमात सहभागी झाला नाही.याविषयी खैरेवाडीचे बाळू उघडे यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला मंगळवारी कार्यक्रम होईल, अशी माहिती मिळाली. प्रत्यक्षात तो कार्यक्रम चिंचले येथे झाला. तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम चिंचले येथे घेत असल्याचे सांगण्यात आले. वाडीवर काही लोकांनी शिधापत्रिका आणून दिल्याचे उघडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल
इगतपुरी तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी ग्रामस्थांचे आरोप फेटाळले. तेथे काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. ती कामे अंतिम टप्प्यात आहेत. या ठिकाणी रस्ते, पूल, पाणी, स्थानिकांना रोजगार असे अनेक विषय आहेत. रस्त्याविषयी वन विभागाशी चर्चा सुरू आहे. स्वदेश फाउंडेशन, प्रशासन यांच्या मदतीने या परिसरात कायमस्वरूपी रस्ते तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात खैरेवाडी येथे कार्यक्रम होईल, असे बारवकर यांनी स्पष्ट केले.