जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विषाणूजन्य लम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, आतापर्यंत ७२ जनावरे दगावल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोळा सण साजरा करण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यामुळे यंदा पोळा सण साजरा होईल की नाही ? त्याबद्दल शेतकरी वर्गात साशंकता निर्माण झाली आहे.

लम्पी हा विषाणूजन्य रोग असून तो प्रामुख्याने गाय, बैल आणि वासरे, अशा गोवंशीय जनावरांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने डास, माशा, गोचीड, चिलट्या यासारख्या रक्तशोषक कीटकांद्वारे होतो. याशिवाय बाधित जनावरांच्या जखमा, शरीरातील स्त्राव किंवा त्यांच्या संपर्कातील वस्तूंच्या माध्यमातूनही हा आजार पसरू शकतो. लम्पी बाधित जनावरांना साधारण १०४ ते १०५ अंशाचा ताप येतो, त्यांचे खाणे-पिणे कमी होते आणि अंगावर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात. पायांना सूज येऊन जनावरे लंगडायला लागतात. डोळे व नाकातून स्त्राव वाहतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. लम्पी रोग वेळीच आटोक्यात न आल्यास जनावरांच्या मृत्यूचीही शक्यता असते. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी त्वचा रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. परिणामी, पशुपालकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

२३ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण १६६ जनावरे लम्पी रोगाने बाधित असताना त्यापैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली होती. तर ५० जनावरांमध्ये वेळेवर उपचार झाल्याने सुधारणा दिसून आली होती. दरम्यान, लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लसीकरणासह उपचारांवर भर दिला. प्रत्यक्षात, त्यानंतरही लम्पी बाधित जनावरांची संख्या १०६५ पर्यंत पोहोचली. आणि ४० जनावरांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू केलेले लसीकरण ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात, २० ऑगस्ट अखेरच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १८३९ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यातील १२२० जनावरे वेळेवर उपचार झाल्याने बरी झाली असली, तरी ५४७ जनावरांवर ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अजुनही उपचार सुरू आहेत. आजतागायत ७२ जनावरे लम्पीमुळे दगावल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना काय ?

दरम्यान, जिल्ह्यात लम्पीने पाय पसरल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जनावरांचे बाजार, शर्यती, वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व गोवर्गीय जनावरांचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता यंदाचा पोळा सण घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पशुपालक शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या घरीच बैल पूजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.