१४८ उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये बंद झालेल्या १४८ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल गुरुवारी दुपापर्यंत कळणार आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांत कल आणि लगोलग अंतिम निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. मतमोजणीची फेरीनिहाय माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जाणार आहे. शिवाय ऑनलाइनही माहिती दिली जाणार आहे. मतदान यंत्र ज्या सुरक्षा कक्षात ठेवले आहेत, तिथे ‘नाइट व्हिजन’ तर मतमोजणीवर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष दिले जाणार आहे. बुधवारी सकाळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पार पडल्यानंतर ते आपआपल्या मतमोजणी केंद्रांकडे रवाना झाले.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर दोन दिवसात मतदारसंघनिहाय मतमोजणीची तयारी प्रशासनाने केली आहे. शहरात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, इगतपुरी आणि देवळाली या पाच मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. उर्वरित मतदारसंघांची मोजणी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्य़ात ६२.०१ टक्के मतदान झाले असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदान झाले असले तरीदेखील १० मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.

बंडखोरी, ऐनवेळचे पक्षांतर, लक्ष्मीदर्शन, मद्याचा महापूर, युतीतील वितुष्ट आदींमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. घसरलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची मांडली गेलेली समीकरणे किती बरोबर, किती चुकली, हे देखील निकालातून समजणार आहे. राजकीय पटलावर निकालाविषयी हुरहुर, उत्सुकता असताना प्रशासन मतमोजणीच्या तयारीत मग्न आहे.

मतमोजणीसाठी सुमारे दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची सरमिसळ प्रक्रिया सकाळी आठ वाजता पार पडली. नंतर संबंधितांना आपापल्या मतमोजणी केंद्रांकडे रवाना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. मतदारसंघनिहाय मतपेटय़ा ज्या सुरक्षा कक्षात ठेवल्या गेल्या, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सुरक्षा कक्षात रात्री चित्रीकरणाची क्षमता असणारे कॅमेरे बसविले गेले असून मतमोजणीवेळी प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

जिल्ह्य़ातील प्रमुख लढती

  • नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप), अपूर्व हिरे (राष्ट्रवादी काँग्रेस),
  • विलास शिंदे (सेना बंडखोर)
  • नाशिक मध्य – प्रा. देवयानी फरांदे (भाजप), नितीन भोसले (मनसे),
  • डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस)
  • नाशिक पूर्व – अ‍ॅड. राहुल ढिकले (भाजप), बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)
  • देवळाली – योगेश घोलप (शिवसेना), सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
  • इगतपुरी – हिरामण खोसकर (काँग्रेस), निर्मला गावित (शिवसेना)
  • सिन्नर – राजाभाऊ वाजे (शिवसेना), माणिक कोकाटे (राष्ट्रवादी)
  • निफाड – अनिल कदम (शिवसेना), दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
  • येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी), संभाजी पवार (शिवसेना)
  • नांदगाव – पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), सुहास कांदे (शिवसेना)
  • मालेगाव (बाह्य़) – दादा भुसे (शिवसेना), डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस)
  • मालेगाव (मध्य) – आसिफ शेख (काँग्रेस),

        मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम)

  • चांदवड/देवळा – डॉ. राहुल आहेर (भाजप), शिरीष कोतवाल (काँग्रेस)
  • बागलाण – दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी), दिलीप बोरसे (भाजप)
  • कळवण – नितीन पवार (राष्ट्रवादी), मोहन गांगुर्डे (शिवसेना),
  • जे. पी. गावित (माकप)
  • दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), भास्कर गावित (शिवसेना)

पाच तासात अंतिम निकाल हाती येणार 

१५ केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. आयोगाच्या निकषानुसार ऑनलाइन निकाल कसा अपलोड करायचा याची तालीम घेण्यात आल्याचे मांढरे यांनी सांगितले. मतमोजणीसाठी मतपेटय़ा असलेला सुरक्षा कक्ष सकाळी साडेसात वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत उघडला जाईल. टपाली आणि ईटीपीबीएस मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मोजणी टेबलांवर सुरू होईल. पाच तासात म्हणजे दुपारी १२ ते एक वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल, असा अंदाज आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडणार आहे. वैध ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.