लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील लवाटेनगर येथील जलकुंभातील वितरण प्रणालीतील दोषामुळे संभाजी चौकातील रहिवाश्यांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे वारंवार सांगितले गेले. परंतु, अद्याप अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी आले. पाण्याचे टँकरही उपलब्ध झाले नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.

संभाजी चौक परिसरात काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात स्थानिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लवाटेनगर येथील जलकुंभातून या परिसरात पाणी पुरवठा होतो. व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, चार ते पाच दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार मॅग्मोप्रकाश कॉलनीतील रहिवासी अंजली बुटले यांनी केली. यासारखी समस्या प्रेस्टिज पार्क व आसपासच्या रहिवाशांना भेडसावत आहे.

आणखी वाचा-निर्यातबंदी उठविण्याची तयारी अन् नाशिक जिल्ह्यात कांद्याची उसळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात स्थानिकांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारीही केल्या. आज सुरळीत होईल, उद्या सुरळीत होईल अशी उत्तरे दिली गेली. परंतु, रविवारपर्यंत सुधारणा झाली नाही. ज्यांच्याकडे दोन नळ जोडण्या आहेत, त्यांच्याकडे कमी दाबाने पाणी आले. उर्वरित रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी होती. त्यामुळे पाण्याचे टँकर देखील उपलब्ध झाले नसल्याचे बुटले यांच्यासह अन्य नागरिकांनी सांगितले.

या संदर्भात पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या भागातील व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नमूद केले. दुरुस्ती झाली असून लवकरच उपरोक्त भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.